मूक आणि कर्णबधिर कलाकाराने पालीतील मोकळ्या भिंतीवर साकारली प्रबोधनात्मक कलाकृती

13 Apr 2021 16:24:25
पाली/गोमाशी (भूषण सुतार) : पाली शहरातील मोकळ्या, जर्जर व खराब झालेल्या भिंती झाडांचे कट्टे आता आकर्षक, विलोभनीय आणि प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या झाल्या आहेत. येथे मूक आणि कर्णबधिर तरुण कलाकार चेतन पाशीलकर हा गेली कित्येक दिवस चित्रकारी करत आहे. लॉकडाऊन विकेंड मध्ये देखील आपली चित्रकारी करत होते.
 
palii0256_1  H
 
नगरपंचायत प्रशासक दिलीप रायन्नावार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पालीत सर्वत्र राबविला जात आहे. या भिंती प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या सुधागड-पाली पंचायत समिती कार्यालय, गटसाधन केंद्र आणि येथील इतर कार्यलयाच्या बाजूने असलेल्या संपूर्ण संरक्षक भिंतीवर आकर्षक चित्र व एकात्मतेचे आणि प्रबोधनात्मक संदेश देणारी चित्रे काढण्याचे काम सुरू आहे. या भिंतीवर वाघ, सिंह, हरीण, कुत्रा, धीवर आदि पक्षी व प्राण्यांची चित्रे रेखाटली आहेत. याबरोबरच वृक्ष संवर्धन, सामाजिक, धार्मिक एकात्मता निसर्ग चित्रे व आरोग्य संदेश देणारी आकर्षक चित्रे, कोरोना बाबत जनजागृती करणारी, शासनाच्या योजना व कामे आदींची माहिती या भिंतींवर चित्रित केली आहेत. ही चित्रे येथील तरुण चित्रकार चेतन पाशीलकर काढत आहे.
 
चेतन पाशीलकर कर्णबधिर व मुके आहेत. जेजे स्कुल ऑफ आर्ट्स मधून फाईन आर्ट्स मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांची पत्नी आरती पाशीलकर या डिजिटल पेंटिंग द्वारे स्टोरी बोर्ड तयार करतात, तसेच कन्सेप्ट बनवितात आणि चेतन त्याद्वारे चित्र साकारतात. अशा प्रकारे चेतन यांना आरती या कामात मदत करत आहेत. आरती यांना कमी ऐकू येते. हे पती , पत्नी मिळून पालीची नेत्रदीपक ओळख निर्माण करत आहेत. पालीत याबरोबरच शास्त्रज्ञ व क्रांतिवीर यांची चित्रे व कामे, गडकिल्ले, राष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रीय नेते आदी चित्रे देखील पालीतील विविध ठिकाणच्या भिंतींवर साकारण्यात येणार आहेत. अशा प्रकारे पालीतील सर्व मोकळ्या आणि खराब झालेल्या भिंतींचा वापर प्रबोधनात्मक संदेश व जनजागृती करण्यासाठी आणि परिसर स्वच्छ व आकर्षक करण्यासाठी केला जाणार आहे अशी माहिती प्रशासक दिलीप रायन्नावार यांनी दै जनदूतला दिली.
 
प्रशासक दिलीप रायन्नावार यांचा कल्पकतेतून साकार होणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भिंती आकर्षक करून त्यातून प्रबोधन व जनजागृती करण्याचे हे काम खूप प्रभावी आहे. यातून हा परिसर विलोभनीय तर दिसेलच याबरोबर एकात्मतेची व आपल्या कर्तव्यांची आठवण देखील करत राहील.
- निखिल खैरे, अध्यक्ष शिवशंभू प्रतिष्ठान रायगड
Powered By Sangraha 9.0