कडक निर्बंधांमुळे मंडप डेकोरेटर्स, साऊंड सिस्टम, डी. जे वाल्यांचा वाजला बँण्ड

जनदूत टिम    11-Apr-2021
Total Views |
भिवंडी ग्रामीण : गेल्या वर्षीचा लग्नाचा हंगाम कोरोणाच्या महामारी मुळे वाया गेला असतानाच या वर्षीही दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लग्नाचा हंगाम चांगला सुरू होऊन, थोडेफार उभे राहता येईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ऐन लग्नसराईत लग्न समारंभावर कडक निर्बंध आले.

bhiwandi5555_1   
 
गेल्या वर्षी तर मंडप डेकोरेटर्सनी कसे तरी आपल्या जवळील कामगारांना सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता तर लग्न समारंभावरच बंधने आल्याने त्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यात पुन्हा एकदा लॉकडाउनच्या भीतीने कामगारांनी गावाकडची वाट धरल्याने त्याचा फटकाही बसणार आहे.
 
गेल्या वर्षभरात काम नसल्याने अनेक मंडप डेकोरेटर्स कर्जबाजारीपणामुळे उध्वस्त झाले आहेत. त्यातच काही महिन्यांपूर्वी मिळालेल्या मोठ्या ऑर्डरी रद्द होत आहेत. तर काही ऑर्डर 50 लोकांच्याच मिळत असल्याने आता जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. लग्ना बरोबरच मार्च-एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात जेवणावळी साठी कॅटर्सची ऑर्डर मिळत असे. त्यावरही अवलंबून असणाऱ्या घटकांचा उदरनिर्वाह बुडाला आहे. अनेक डेकोरेटर्स जवळील माणसे कोरोनाच्या भीतीने व कडक निर्बंधामुळे गावाला जाऊ लागल्याने त्याचा फटकाही मंडप डेकोरेटर्सना बसू लागला आहे. 
 
या व्यवसायाशी निगडित इतर व्यवसायिकही देशोधडीला लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असे अनेक छोट्यातले छोटे व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यांचाही उदरनिर्वाहाचा शासनाने विचार करावा असे बोलले जात आहे.
 
गेल्या वर्षापासून बंद असलेल्या मंडप डेकोरेटर्स व्यवसाय कुठेतरी चालू होणार होता. तर ऐन लग्नसराईमध्ये कोरोनाने आमचे हजारो रुपयांचे नुकसान केले आहे. आमच्या व्यवसायात काम करणारे मजूर, फुलवाले, गार्डनिंग, इन्वर्टर, बॅन्जो, डीजे, फिल्टर पाणी यांचा सर्वांचा उदरनिर्वाह बंद झाला आहे. ऐकमेकांवर अवलंबून असणारे व्यवसाय कोरोणामुळे देशोधडीला लागतील कोरोना मुळे तर मरतीलच, परंतु उपासमारीने आत्महत्या करावी लागेल अशी परिस्थिती आमच्यावर आली आहे.
- मंडप डेकोरेटर्स व्यवसायिक सुरेश काशिनाथ चौधरी रा. चौधरपाडा, शिवनगर भिवंडी