पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करा - आयुक्त डॉ. पंकज आशिया

11 Apr 2021 12:33:56
भिवंडी : पुढील दोन महिन्यात पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक जी कामे असतात ती हाती घ्या, जसे नाले व गटार सफाई. नाले सफाई प्रक्रिया सुरू करा. ज्या सखल भागात पाणी साचते, व त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी याबाबतची सर्व कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात शहरात विविध आपत्ती येत असतात अशा आपत्तीच येणार नाही याची दक्षता पालिका स्तरावर घेण्यात यावी, असे पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी सर्व विभाग प्रमुख यांना आदेश दिले.
 
verma0256_1  H
 
पावसाळ्यात येणारी आपत्तीबाबत व त्यावर करावयाच्या उपाययोजना या बाबत पालिका व पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक पालिकेत झाली, त्यावेळी आयुक्त यांनी सर्व विभाग प्रमुख आदेश यांना दिले. यावेळी भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्यालय व आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त दीपक झिंजाड, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत ढोले, टोरंट विद्युत पुरवठा कंपनी, भारत संचार निगम कंपनीचे अधिकारी,पालिका शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड व अन्य अधिकारी उपस्थित होते.
 
या वेळी पालिका आयुक्त यांनी सर्व रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला, ज्या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत ती कामे पूर्ण करावीत, रस्त्यातील खड्डे दुरुस्त करावेत. ज्या सखल भागात पाणी साचते त्या भागाची स्वंतत्र यादी तयार करून त्याकडे विशेष लक्ष द्यावे, कामवारी नदीला पूर आल्यावर शहरात पुराचे पाणी येते अशावेळी पूरस्थिती परिस्थिती निर्माण होते, त्याकडे लक्ष देणे. आपत्तीच्या काळात जर काही ठिकाणी नागरिकांना विस्थापित कक्षात हलविण्याचे प्रसंग आल्यास त्या ठिकाणी मूलभूत सोयी लाईट, पाणी, अन्न पाकिटे पुरविण्यात यावित.
 
जर्जर, मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक, धोकादायक इमारती यांची तपासणी करण्यात यावी ज्या इमारती खचणे, पडणे त्यामुळे जीवित हानी होणे, अशा घटना पावसाळ्यात घडतात अशा घटना घडू नये म्हणून अशा सर्व अतिधोकादायक इमारती यांची तपासणी करावी. ज्या इमारती अतिधोकादायक आहेत, राहण्यास अयोग्य आहेत त्या रिकाम्या करून घेण्यात याव्यात, त्यांचा विद्युत व पाणी पुरवठा खंडित करण्यात यावा. तसेच पावसाळ्यात झाडे पडून अपघात होतात, अशा झाडांच्या फांद्या
छाटणे, झाडे पडून अपघात होणार नाही याबाबत काळजी घेणे.
 
आरोग्य विभागामार्फत दैनंदिन साफसफाई , औषध फवारणी करणे. बाजार पेठ भाजी मार्कट परिसरात चिखल साचणार नाही, याची दक्षता घेणे, तेथे वेळच्या साफ साफसफाई करणे. पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार लक्षात घेता याकरिता १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वैद्यकीय आरोग्य अधिकारी तैनात करणे, त्यासाठी लागणारी आवश्यक औषधे याचा साठा तयार करून ठेवणे. शहर आपत्ती कृती आराखडा तयार करणे, संपर्क पुस्तिका तयार करणे, मुख्य आपत्कालीन कक्ष २५००४९ या नंबरवर संपर्क साधणे, एन. डी.आर.एफ.पथक, आपत्ती कृती दल यांच्या संपर्क राखणे. मुख्य आपत्कालीन कक्षात २४ तास अधिकारी वर्ग तैनात करणे, अग्निशमन विभाग याकरिता लागणारे अत्यावश्यक साधन साहित्य याची तपासणी करून घेणे. पालिकेचे सर्व वाहने कार्यरत राहतील याची दक्षता घेणे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वादळी वारे, मुसळधार पाऊस याची माहिती नागरिकांना देणे.
 
आपत्ती पूर्व सज्जता व आपत्ती नंतर करावयाचे उपाययोजना यासंबंधी माहिती स्थानिक नगरसेवक, नागरिक, सामाजिक संघटना, पत्रकार यांना देणे. त्यांचे सहकार्य घेणे शहरात नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्व विभागाने सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे असल्याचे प्रतिपादन आयुक्त यांनी केले.
Powered By Sangraha 9.0