राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजीटल मार्केटींग आणि कृत्रीम बुद्धीमत्तेचे प्रशिक्षण

जनदूत टिम    23-Mar-2021
Total Views |

  • कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ
  • एचडीएफसी बँक आणि फ्यूएल संस्थेचा पुढाकार

मुंबई : एचडीएफसी बँक आणि फ्यूएल या स्वयंसेवी संस्थेमार्फत राज्यातील १ हजार ८०० तरुणांना कृत्रीम बुद्धीमत्ता (आर्टीफिशीयल इंटेलिजन्स) आणि डिजीटल मार्केटींगचे ट्रेनिंग आणि करिअर समुपदेशन देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते मंत्रालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
 
Malik_1  H x W:
 
एचडीएफसी बँकेने महाराष्ट्रातील तरुणांसाठी फ्यूचर स्किल्स इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू केला आहे. बँकेच्या सीएसआर निधीमधून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी फ्यूएल (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जाझींग लाइव्ह्ज) ही स्वयंसेवी संस्था विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशन, प्रशिक्षण आणि जॉब प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन करणार आहे.
 
या उपक्रमाद्वारे एचडीएफसी बँक महाराष्ट्रातील १ हजार ८०० पेक्षा जास्त तरुणांना करिअरविषयक सल्ला व कौशल्य प्रशिक्षण देईल. शिवाय या तरुणांना प्रशिक्षणानंतर आयटी/आयटीईएस क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधण्यास मदत करेल. प्रशिक्षणासाठी पात्र तरुण http://bit.ly/maharashtraregistration येथे नोंदणी आणि अर्ज करू शकतात. हे प्रशिक्षण एकुण सुमारे २०० तासांचे असेल. प्रशिक्षण पुणे येथे ऑफलाईन पद्धतीने तर इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने होईल.
 
कौशल्य विकास मंत्री मलिक यावेळी म्हणाले की, एचडीएफसी बँक आणि फ्यूएल या स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तरुणांना फक्त कौशल्य प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना रोजगारही मिळणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मागील वर्षी कोरोनाचे संकट असतानाही रोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल यासह विभागाच्या विविध उपक्रमांमधून राज्यात १ लाख ९९ हजार बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले आहे. यापुढील काळातही असे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील. यासाठी सीएसआरमधूनही मोठे सहकार्य मिळत असून एचडीएफसीसारख्या विविध संस्था सहकार्य करीत आहेत. सीएसआर आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या अशा सर्व उपक्रमांना शासनामार्फत संपूर्ण पाठबळ देण्यात येईल, असे ते म्हणाले.
 
एचडीएफसी बँकेच्या सीएसआर प्रकल्प प्रमुख नुसरत पठाण म्हणाल्या की, एक सामाजिक जबाबदार कॉर्पोरेट संस्था म्हणून राज्यातील तरुणांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन अधिकाधिक तरुणांना नोकरीस तयार करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. यामुळे तरुणांच्या रोजगाराची क्षमता वाढेल. त्यांना अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी मिळू शकतील. तरुणांसाठी हा उपक्रम प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त तरुणांना त्यांच्या पायावर ऊभे करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
 
फ्यूएलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केतन देशपांडे म्हणाले की, गरजू तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी एचडीएफसी बँकेबरोबर झालेल्या भागीदारीबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. भविष्यात अशा आणखी संधींसाठी आम्ही उत्सुक आहोत. प्रशिक्षणाचा हा उपक्रम आम्ही प्रभावीपणे राबवू, असे त्यांनी सांगितले.
 
कार्यक्रमास एचडीएफसी बँकेच्या सीएसआर प्रकल्प प्रमुख नुसरत पठाण, फ्यूएल (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जाझींग लाइव्ह्ज) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केतन देशपांडे, एचडीएफसी बँकेच्या सीएसआर टीमचे रितेश सिन्हा, राजा उपाध्याय, फ्यूएलचे चीफ मेंटॉर संतोश हुरळीकोप्पी, हेड (नॉर्थ) बाजीप्रभू देशपांडे, मास्टर ट्रेनर अबोली मिश्रा आदी मान्यवर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उपस्थित होते.