तुंबाडचे खोत या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक श्रीपाद नारायण पेंडसे

जनदूत टिम    21-Mar-2021
Total Views |
श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म मुर्डी (जि.रत्नागिरी) येथे झाला. बी.एस्.सीपर्यंतचे शिक्षण मुंबईला पार पडले. मुंबईच्या बेस्टमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. १९६८पासून निवृत्तीपर्यंत ते तेथेच कार्यरत होते. स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरीप्रांतातील एक महत्त्वाचे कादंबरीकार. फडके-खांडेकर-माडखोलकर या कादंबरीकारांनी मराठी कादंबरी लोकप्रिय आणि रसिकप्रिय करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
 
SHRI-NA-PENDSE-PHOTO (1)_
 
साधारणतः १९२० ते १९४५ या पाव शतकात या कादंबरीकारांनी आपल्या प्रतिभेने मराठी वाचकांवर अधिराज्य गाजविले. पण हे अधिराज्य गाजवताना आणि कादंबरी या वाङ्मय प्रकाराला अपूर्व लोकप्रियता मिळवून देताना ह्या कादंबरीकारांनी कादंबरीला साचेबंदपणाच्या आणि कृत्रिमतेच्या चौकटीत नेऊन बसविले. प्रस्तुत दोन दोषांमध्ये ही कादंबरी अडकल्यामुळे आणि कलावादाच्या व जीवनवादाच्या चर्चेत तिची घुसमट झाल्यामुळे या काळातील कादंबरी निर्जीव आणि नि:सत्त्व होत गेली. या पार्श्वभूमीवर श्री.ना.पेंडसेंचे कादंबरीलेखन मराठी कादंबरीविश्वाला नव्या दिशा देणारे ठरले.
 
मराठी कादंबरीविश्वात ‘प्रादेशिकता’ ही संकल्पना ठाशीवपणे समोर आली ती श्री.ना.पेंडसे यांच्या ‘एल्गार’ या पहिल्याच कादंबरीमुळे. १९२० ते १९४५ या काळातील मराठी कादंबरीचा एकूण परिघ आणि तिची आंतर्बाह्य प्रकृती लक्षात घेऊन आपली कादंबरी कशी असावी, यापेक्षा ती कशी नसावी; याची खूणगाठ त्यांनी आपल्या मनाशी बांधून ‘एल्गार’ची निर्मिती केली होती. त्यामुळे ही कादंबरी जाणकारांच्या-समीक्षकांच्या पसंतीस उतरली आणि या कादंबरीसोबतच मराठी प्रादेशिक कादंबरीची संकल्पनाही रूढ झाली.
 
‘एल्गार’पूर्वी ‘खडकावरील हिरवळ’ हे पेंडसेंचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१मध्ये प्रसिद्ध झाले होते. पेंडसेंच्या कादंबरीलेखन प्रवासाच्या दृष्टीने विचार केला, तर ‘खडकावरील हिरवळ’ या पुस्तकाला विशेष महत्त्व द्यावे लागेल. कारण पेंडसेंनी पुढे ज्या कादंबर्‍या लिहिल्या, त्यांतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा या पुस्तकातीलच आहेत. आपल्या अवती-भवतीच्या माणसांचा, त्यांच्या भावविश्वाचा सतत शोध घेत राहणे, ही मुळात पेंडसेंची प्रकृती असल्यामुळे त्यांच्या समग्र कादंबरीविश्वाचा आधार म्हणून ‘खडकावरील हिरवळ’ या पुस्तकाचे महत्त्व नाकारता येत नाही.
 
१९४९मध्ये ‘एल्गार’ प्रकाशित झाली आणि त्यानंतर लागोपाठ सकस आणि सरस कादंबर्‍या लिहून पेंडसेंनी मराठी साहित्यविश्वात कादंबरीकार म्हणून आपली नाममुद्रा अधिक ठळक केली. ‘एल्गार’ (१९४९), ‘हद्दपार’ (१९५०), ‘गारंबीचा बापू’ (१९५२), ‘हत्या’ (१९५४), ‘यशोदा’ (१९५७), ‘कलंदर’ (१९५९), ‘रथचक्र’ (१९६२), ‘लव्हाळी’ (१९६६), ‘ऑक्टोपस’ (१९७२), ‘तुंबाडचे खोत’ (१९८७), ‘गारंबीची राधा’ (१९९३), ‘एक होती आजी’ (१९९५), ‘कामेरू’ (१९९७), ‘घागर रिकामी रे, रंगमाळी’ (२००२), ‘हाक आभाळाची’ (२००७) या कादंबर्‍या लिहून मराठीतील अग्रेसर कादंबरीकाराचा मान पटकावला.
पेंडसेंच्या या कादंबरी विश्वाचा मूळ आधार आहे तो कोकणप्रांत. कोकणचा निसर्गरम्य परिसर, तिथल्या माणसांचे जगणे, तिथले दारिद्र्य, तिथल्या निसर्गाचा मानवी जीवनावर झालेला दूरगामी परिणाम, तिथल्या देव-दैवतांच्या संकल्पना आणि माणसांची मानसिकता यांचे अतूट नाते इत्यादी घटक या कादंबरी विश्वाचे मूलस्रोत आहेत. या मूलस्रोतांचा अधिक परिणामकारक उपयोग श्री.ना.पेंडसेंनी आपल्या कादंबरीलेखनात करून एक नवे, अनोखे विश्व उभे करण्याचे कार्य केले आहे. पेंडसेंच्या कादंबर्‍यांमधील हा निसर्ग वाचकांना झपाटून टाकणारा, त्यांच्यावर जणू चेटूक करणारा आहे, हे सिद्ध झालेले आहे. विशेषःत हे चेटूक ‘गारंबीचा बापू’ने अधिक अमीट स्वरूपाचे केलेले आहे.
 
प्रादेशिकता हे कलाकृतीचे स्वायत्त मूल्य आहे का? वाङ्मयीन निकषांवर प्रादेशिकता ही संज्ञा कितपत टिकू शकते? इत्यादी प्रश्न पेंडसे यांच्या कादंबर्‍यांनी निर्माण केले. त्यावर खुद्द श्री.ना.पेंडसेंनी दिलेले उत्तर अधिक महत्त्वाचे व माननीय असे आहे. ते म्हणतात- “एखादा प्रदेश कितीही जिवंत केला, अन्य पात्रांच्या बरोबरीने तो वावरत आहे, असा प्रत्यय वाचकाला आला; तरी अखेरच्या विश्लेषणात या वैशिष्ट्याला स्थान राहत नाही. शहरी बायांच्या मेळाव्यात घट्ट कासोट्याच्या कोळिणीने धिटाईने प्रवेश केला, तर ती ज्याप्रमाणे सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेईल असं काहीतरी प्रादेशिक कादंबरीच्या बाबतीत होतं. लक्ष वेधून घेण्यापर्यंत ठीक, पण सौंदर्याच्या स्पर्धेत तिच्याकरिता वेगळ्या कसोट्या असू शकत नाहीत. माझ्या कादंबर्‍यांकडे पाहताना त्या प्रादेशिक आहेत, याची मी दखलही घेत नाही. मला जे जाणवतं ते सर्जनाचा विषय होण्याला पात्र आहे का? जीवनाचा किती खोलवर मी ठाव घेतो आहे? माझ्या निर्मितीत व्यापक सत्याचा अंश आहे का? मी माणसं निर्माण करतो की ठोकळे? या निकषांवर माझी कादंबरी लटपटणार असेल, तर प्रादेशिकतेचं पलिस्तर तिचं संरक्षण काय करणार?” (रथचक्र: चौथी आवृत्ती: प्रस्तावना: पृ.१३) प्रस्तुत विवेचनावरून कादंबरीची महत्ता कशात आहे, हे स्पष्ट होते आणि त्या दृष्टीने विचार केला, तर पेंडसेंच्या कादंबर्‍या वाङ्मयीन गुणवत्तेतही श्रेष्ठ असल्याचे जाणवते.
 
कादंबरी लेखनासोबतच पेंडसेंनी नाट्यलेखनही केलेले आहे. पेंडसेंची बहुतेक नाटके त्यांच्याच कादंबर्‍यांवर आधारित आहेत. त्यांपैकी ‘राजेमास्तर’ (हद्दपार), ‘यशोदा’ (यशोदा), ‘गारंबीचा बापू’ (गारंबीचा बापू), ‘असं झालं आणि उजाडलं’ (लव्हाळी), ‘रथचक्र’ (रथचक्र) या नाटकांचा उल्लेख करता येईल. त्याशिवाय स्वतंत्र नाटके म्हणून ‘महापूर’, ‘चक्रव्यूह’, ‘संभूसांच्या चाळीत’, ‘शोनार बांगला’, ‘पंडित! आता तरी शहाणे व्हा!’, ‘डॉ.हुद्दार’ इत्यादी नाटकांचा उल्लेख करावा लागेल. पेंडसेंनी आपल्या कादंबर्‍यांची यशस्वी नाट्यरूपांतरे करून कलांतराचा सुंदर वस्तुपाठच वाचकांपुढे ठेवला, असे म्हणता येईल.
कादंबरी लेखन आणि नाट्यलेखन ह्यांच्या सोबतच काही स्फुटलेखनही पेंडसेंनी केले. त्यात मुख्यतः कादंबरी आणि अवती-भवतीच्या माणसांचा, समाजाचा चिंतनाच्या पातळीवर शोध होता. ‘एक मुक्त संवाद- उद्याच्या कादंबरीकारांशी’, ‘अज्ञाताचा शोध’, ‘एक दुर्लभ स्नेह’, ‘बेस्ट उपक्रमाची कथा’ यांचा या संदर्भात विचार करता येईल. याशिवाय पेंडसेंनी ‘श्री.ना.पेंडसे: लेखक आणि माणूस’ हे आत्मचरित्रही लिहिले. प्रस्तुत आत्मचरित्र हा मराठी आत्मचरित्र वाङ्मयातील एक वेगळा प्रयोग होता. एक मित्र श्री.ना.पेंडसे यांचे चरित्र लिहितो आहे, या शैलीतील हे आत्मचरित्र अधिक तटस्थ आणि प्रांजळ अशा स्वरूपाचे झालेले आहे.
व्यक्तिचित्रे, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र, स्फुट अशा विविध स्वरूपाचे लेखन करताना पेंडसेंनी कथा (जुम्मन) आणि अनुवाद (प्रायश्चित्त: स्कार्लेट लेटर) याही प्रांतांत आपले पाऊल ठेवलेले आहे; पण हे सगळे करताना पेंडसेंच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आणि त्यांचे वाङ्मयीन मोठेपण व्यक्त होते ते कादंबरी वाङ्मयातूनच!
 
पेंडसे यांच्या कादंबर्‍यांचे अनुवादही भारतीय आणि जागतिक भाषांमध्ये झालेले आहेत. त्यांपैकी गुजरातीमध्ये ‘हद्दपार’, ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘कलंदर’, ‘रथचक्र’; हिंदीमध्ये ‘गारंबीचा बापू’, ‘रथचक्र’, ‘तेलगूत ‘जुम्मन’, ‘रामशरणची गोष्ट’; इंग्रजीत गारंबीचा बापू (Wild Bapoo of Garambi- भाषांतर : इएन रेसाईड, युनेस्को प्रकाशन) हद्दपार (Sky is the limit-भाषांतर: ज्ञानेश्वर नाडकर्णी; अप्रकाशित) या पुस्तकांचा उल्लेख करता येईल. त्यांच्या पुस्तकांना जे पुरस्कार प्राप्त झाले, त्यांचा उल्लेख पुढीलप्रमाणे करता येईल. नॅशनल लायब्ररी (नागपूर) पारितोषिक (एल्गार), महाराष्ट्र राज्य पुरस्कार (हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसाच्या चाळीत, चक्रव्यूह) महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा पुरस्कार (संभूसाच्या चाळीत), साहित्य अकादमीचा पुरस्कार (रथचक्र), प्रियदर्शनी पुरस्कार (तुंबाडचे खोत) ना.पेंडसे यांच्या एकूणच वाङ्मयीन कर्तृत्वाचा सन्मान करणारे बहुमानही त्यांना बहाल करण्यात आले आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (१९९३), महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (१९९६), अमेरिकेतील डॉ.लाभसेटवार प्रतिष्ठानचा लाभसेटवार साहित्य सन्मान पुरस्कार (१९९९) या मोठ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. १९५५ मध्ये रॉकेफेलर फाउंडेशनची जगाच्या प्रवासासाठी ट्रॅव्हलिंग फेलोशिप त्यांना प्राप्त झाली होती.
 
मित्रपरिवारात आणि कौटुंबिक वर्तुळात श्री.ना.पेंडसे शिरूभाऊ या नावाने ओळखले जायचे. त्यांच्या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाच्या संदर्भातही ‘ना.पेंडसे’ऐवजी ‘शिरूभाऊ’ हेच नाव अधिकतर रूढ झाले होते. मराठीच्या कादंबरी विश्वाचा समग्र धांडोळा घेताना आणि मराठी कादंबरीच्या विकासक्रमाचे टप्पे सांगताना हरिभाऊ ते शिरूभाऊ असाही उल्लेख केला जातो, त्यावरून मराठी कादंबरी विश्वातील श्री.ना.पेंडसेंचे स्थान किती महत्त्वाचे आहे, ते जाणवते.
 
मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार कै. श्रीपाद नारायण पेंडसे. प्रारंभी आपल्या कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां. नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले. फडके, खांडेकर प्रभावित मराठी कादंबरी एका आवर्तात फिरत असताना पेंडसे यांच्या कादंबरीने एक नवी वाट चोखाळली. मराठीत प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली.
 
कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच श्री.ना.पेंडसे यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा १९३८ मधे प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. ‘खडकावरील हिरवळ’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले आणि शेवटचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक. ‘जुम्मन’ (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही. व्यक्तीचा शोध, व्यक्तिमनाचा समग्र विचार हे त्यांच्या लेखनामागील प्रधान सूत्र होते. त्यांना सुचलेल्या कादंबऱ्या या बहुश: त्यांच्या आयुष्यातील त्यांनी पाहिलेल्या माणसांवरून सुचलेल्या आहेत. विशिष्ट प्रदेशात आणि वातावरणात माणसांची मने आणि जीवने कसकसे रंग धारण करतात, ह्यासंबंधीच्या शोधातून आणि आकलनातून जन्माला आल्यामुळे पेंडशांच्या कादंबरीला मोठे बळ लाभलेले आहे. तथापि कल्पनारम्यता आणि स्वप्नरंजन ह्यांचा मोह त्यांनाही पूर्णत: टाळता आलेला नाही, अशी टीकाही त्यांच्या कादंबऱ्यांवर झालेली आहे. त्यांनी नाट्यलेखनही केलेले आहे. राजे मास्तर (१९६४), यशोदा (१९६५), गारंबीचा बापू (१९६५), असं झालं आणि उजाडलं (१९६९) ही त्यांची नाटके त्यांच्या अनुक्रमे हद्दपार,यशोदा, गारंबीचा बापू आणि लव्हाळी ह्या कादंबऱ्यांची नाट्यरूपे असून महापूर (१९६१), संमूसांच्या चाळीत (१९६७), चक्रव्यूह (१९७०) अशी काही स्वतंत्र नाटकेही त्यांनी लिहिली आहेत. जुम्मन (१९६६) हा त्यांचा कथासंग्रह.
n