अधिकाऱ्यांची बदली हे आमचं टार्गेट नाही

18 Mar 2021 14:53:32

  • मनसुख हिरेन हत्या आणि स्फोटके प्रकरण धसास लागावं अंतिम हेतू

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणं, हे स्वाभाविक असले तरी पोलीस आयुक्तांची बदली हे आमचं टार्गेट नाही, तर मनसुख हिरेन प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याचं प्रकरण धसास लागावं, हा आमचा अंतिम हेतू आहे, अशी प्रतिक्रिया परमबीर सिंग यांच्या बदलीसंदर्भात विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
 
Pravin-Darekar-latur_1&nb
 
आज महाविकास आघाडीने मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची तातडीने उचलबांगडी केली. हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली असून रजनीश शेठ यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान परम बीर सिंग यांना गृह रक्षक दलात पाठवण्यात आले असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने घेतलेल्या या तातडीच्या निर्णयामुळे पोलीस दलात तसेच राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा असून यासंदर्भातच दरेकर आपली प्रतिक्रिया देत होते. ते असंही म्हणाले की, परम बीर सिंह यांची गच्छंती झाल्याचं पहायला मिळत आहे.
 
मनसुख प्रकरणात वाझे नावाचा अधिकारी सहभागी होता आणि त्याला कंट्रोल करणारे पोलीस आयुक्त होते. त्यामुळे उद्या या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं तर मुंबई पोलीस दलासाठी तो मोठा धक्का असला असता, त्यामुळेच पोलीस आयुक्तांची बदली ही स्वाभाविक आहे.
 
पुजा चव्हाण प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल केला गेलेला नाही, संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे पुजाला न्याय मिळाला असं होत नाही, अरूण राठोड अजून गायब आहे, रुग्णालयात दाखल झालेली पुजा अरूण राठोड कोण, याचाही शोध लागलेला नाही, पुजा चव्हाण प्रकरणात ज्याप्रमाणे पुरावे नष्ट केले गेले त्याप्रमाणे मनसुख हिरेन प्रकणात होऊ नये, या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आली पाहिजे, हेच आमचं ध्येय असल्याचंही प्रविण दरेकर म्हणाले.
Powered By Sangraha 9.0