नाथसंप्रदायाच्या इंटरनॅशनल सेमिनारमधील चवंडके यांचा सहभाग महाराष्ट्रास भूषणास्पद -प्रा.डाॅ.अनिल सहस्त्रबुध्दे

जनदूत टिम    16-Mar-2021
Total Views |
नगर : पत्रकारितेमधून इतिहास संशोधनापर्यत अतिशय परिश्रमपूर्वक अन् प्रामाणिकपणे मिलिंद चवंडके यांनी मारलेली मजल कौतुकास्पद असून उत्तर हिंदुस्थानमधील नाथ नाथसंप्रदायाच्या इंटरनॅशनल सेमिनारमधील चवंडके यांचा सहभाग नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रास भूषणास्पद आहे, असे प्रतिपादन प्रा.डाॅ.अनिल सहस्त्रबुध्दे यांनी केले.
 
महायोगी गुरू श्रीगोरक्षनाथ शोधपीठ आणि दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोरखपूर येथे दि.२० ते २२ मार्च २०२१ दरम्यान संपन्न होणा-या इंटरनॅशनल सेमिनारसाठी मिलिंद चवंडके यांना निमंत्रित वक्ता म्हणून बोलावले. या सोहळ्यासाठी निघालेल्या चवंडके यांना आनंदोत्सव परिवाराकडून सन्मानित करून निरोप देण्यासाठी झालेल्या विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
 
nagar_1  H x W:
 
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक प्रा.अशोक नेवासकर उपस्थित होते. विनायक पवळे यांनी स्वागत केले. सौ.ऊषाताई सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते सौ.सोनाली चवंडके यांचा सत्कार करण्यात आला. महादेव कुलकर्णी, प्रा.अशोक नेवासकर व चंद्रकांत पालवे यांच्या हस्ते मिलिंद चवंडके यांना सन्मानित करण्यात आले.
 
प्रा. सहस्त्रबुध्दे पुढे म्हणाले, मिलिंद चवंडके यांनी महाराष्ट्रातील नाथ संप्रदायावर मौलिक संशोधन केले आहे. हे संशोधन अभ्यासकांसह नाथभक्तांपर्यत पोहोचावे, ही त्यांची तळमळ आहे. सनातन संस्कृतीचे जागरण जेथे अखंड सुरू घडते त्या मढी येथील देवस्थान ट्रस्ट मध्ये विश्वस्तपद भूषवताना त्यांनी वेगळेपणाचा ठसा उमटविला. सांस्कृतिक चळवळीत योगदान देत पहिले नाथ संमेलन आयोजित करून लोकांचे डोळे उघडण्याची कौतुकास्पद कामगिरी बजावली. नाथ संप्रदायातील शिवाव्दैत तत्वज्ञानावर भागवत संप्रदाय उभा आहे. गोरखपूर येथे नाथसंप्रदायावर इंटरनॅशनल सेमिनारचे आयोजन होताना मिलिंद चवंडके यांना निमंत्रित वक्ता म्हणून बोलावणे हा महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय, भागवत संप्रदाय, दत्त संप्रदाय, शाक्त संप्रदाय, सिद्ध संप्रदाय आदि संप्रदायांचा अन् नगर जिल्ह्याचा मोठा गौरव आहे. त्याचबरोबर मढी देवस्थानच्या आणि समस्त भटक्या विमुक्त जाती-जमाती यांच्या सनातन सांस्कृतीक परंपरांचा गौरव आहे. महाराष्ट्र सरकारने मिलिंद चवंडके यांच्या संशोधन कार्याची दखल घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही प्रा. सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केली.
 
प्रा. अशोक नेवासकर म्हणाले, दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचा शोध घेताना रूढी-परंपरा अन् मौखिक साहित्याचा मागोवा घेत संशोधन करण्याची मिलिंद चवंडके यांची चिकाटी आदर्शवत आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उपलब्ध नसताना अतिशय मेहनत घेऊन संशोधनासाठी कष्ट घेणे ही नाथसंप्रदायास अपेक्षित असलेली ज्ञानसाधना मिलिंदकडून विनाखंड सुरू आहे. मंदिर संस्कृतीचे रक्षण व्हावे म्हणून शिलालेख, ताम्रपट, मूर्तीविज्ञान यांचा अभ्यास करताना मिलिंदला आई-वडिलांच्या आशीर्वादासह धर्मपत्नीची साथ मिळाली व सद् गुरूंची कृपा लाभली म्हणूनच गोरखपूरच्या इंटरनॅशनल सेमिनारमध्ये सहभाग लाभला. नाथसंप्रदायात गोरखपूर येथे जाणे भाग्याचे समजतात. तेथील व्यासपीठावर बोलण्यासाठी निमंत्रण येणे म्हणजे गुरूगोरक्षनाथांनीच बोट धरणे होय. त्रेतायुगापासूनचा इतिहास असलेल्या गोरखपूर येथील इंटरनॅशनल सेमिनारमध्ये वक्ता म्हणून बोलण्याकरिता मिलिंदने शोधपत्र तयार करताना महाराष्ट्रातील नवनाथांची समाधीस्थळे, साधनास्थळे, तपोभूमी, नाथपंथी आखाडे, गाद्या यांची बारकाव्यांनिशी माहिती लिहिताना शक्य तेथे स्वतः जाऊन पाहणी केली आहे. त्यामुळे गोरखपूरला विव्दान व साधूंपुढे हे संशोधन मांडताना अनेक प्रश्नांचा उलगडा ते सहजपणे करू शकतील, असा विश्वास आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी म्हणाले, पत्रकारितेचे व्रत घेतल्यापासून मिलिंद चवंडके यांना मी पहातो आहे. अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे ते घेतला वसा सांभाळत आहे. नगरमधील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाची धुरा कै.सुरेश जोशी यांनी मिलिंदकडे सोपवल्यापासून संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सर्वांसमोर आहेच. पत्रकार ते इतिहास संशोधक हा मिलिंदचा प्रवास खडतर असला तरी एकला चलो रे...असे म्हणत सुरूच आहे, हे विशेष होय.
ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे म्हणाले, मिलिंद चवंडके यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मी जवळून पाहिले. अनेकदा अन्याय झाले तरी माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, असे म्हणत देवावर श्रध्दा ठेवून जीवनास सामोरे जाण्याचा त्यांचा स्वभाव त्यांना जीवनाच्या कृतार्थतेचा आनंद निश्चित मिळवून देणार आहे. धर्मपत्नीने त्यांना पावलोपावली दिलेली मोलाची साथ विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी मुलांवर उत्तम संस्कार केले आहेत. पत्रकारमित्र त्यांचे आदराने नाव घेतात, हे अनेकदा मी ऐकले आहे. गोरखपूरला वक्ता म्हणून जाण्याचे त्यांना लाभलेले भाग्य हे त्यांच्या अविश्रांत मेहनतीचेच फळ होय, असे श्री. पालवे यांनी सांगितले.
 
सत्कारास उत्तर देताना मिलिंद चवंडके म्हणाले, गुरूजनांनी सपत्नीक केलेल्या या कौतुक सोहळ्यामुळे मी भारावून गेलो. नाथ संप्रदाय गुरूनिष्ठ आहे. गुरूंचा आशीर्वाद सोबत असल्यास जीवनातील संकटावर मात करण्याचे बळ मिळते, हे मी अनेकदा अनुभवले. नाथलिलेचे अनुभव मला पदोपदी येतात त्यातून नाथ नित्य सोबत असल्याची अनुभूती येते. नाथ साहित्याचे संशोधन माझ्याकडून नाथच करवून घेत आहेत. गुरूगोरक्षनाथांच्या कृपेमुळेच गोरखपूरच्या इंटरनॅशनल सेमिनारचे निमंत्रण आले. नाथ संप्रदायावरील विशेष संशोधन करण्याचा आदेश तिथे मिळेल.
 
सौ.सोनाली चवंडके यांनी जीवनात पहिल्यांदा व्यासपीठावर विराजमान होण्याचे भाग्य जागतिक महिला दिनी लाभले व पतीसह सत्कार झाला, मन भरून आले, असे म्हणाल्या. त्यांनी डोळ्यातील आनंदाश्रूंना वाट करून दिली.
 
कार्यक्रमास प्रा. होळेहुन्नूर, प्रा.डाॅ.मच्छिंद्र मालुंजकर, अरूण ठाणगे, कु.प्रतिक्षा कोरगांवकर आदि उपस्थित होते. प्रा.डाॅ.राजु रिक्कल यांनी आभार मानले. उपस्थित सर्वांनी गोरखपूरच्या इंटरनॅशनल सेमिनारसाठी मिलिंद चवंडके यांना शुभेच्छा दिल्या. गुरूजनांकडून मिळालेल्या शुभेच्छा अन् आशीर्वादाने त्यांचे डोळे पाणावले.