तीन महिन्यांनंतर प्रथमच भारतीय संघ शुक्रवारी खेळलेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यात के. एल. राहुल, हार्दिक पंड्या आणि यजुर्वेंद्र चहल यांच्यासारखे ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील तारांकित खेळाडू अपयशी ठरले. परिणामी इंग्लंडने भारताविरुद्ध सर्व विभागांमध्ये मात केली. एका पराभवाने मालिकेतील आव्हान संपुष्टात येत नाही. कर्णधार विराट कोहलीनेही सामन्यानंतर हे मान्य केले. ऋषभ पंत आणि पंड्याकडून स्फोटक आणि मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, असे कोहलीने सांगितले. पंतने २१ आणि पंड्याने १९ धावा केल्या.
पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर आणि हार्दिकवर वेगवान माऱ्याची तर अक्षर पटेल, चहल आणि वॉशिंग्टन सुंदरवर फिरकीची भिस्त होती.पहिल्या सामन्यात राहुल, शिखर धवन आणि विराट ही आघाडीची फळी कोसळली. पण श्रेयस अय्यरने ४८ चेंडूंत ६७ धावांची खेळी साकारत आपली भूमिका चोख बजावली. पण जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या वेगवान माऱ्यापुढे भारताला एकंदर धावांचा वेग राखता आला नाही. त्यामुळे २० षटकांत ७ बाद १२४ एवढीच धावसंख्या भारताला उभारता आली. ‘‘खेळपट्टीवर वैविध्यपूर्ण पद्धतीने चेंडू उसळत असल्याने अपेक्षित फटके खेळता येत नव्हते. त्यामुळे श्रेयसची खेळी म्हणजे कशा रीतीने खेळावे, हा आमच्यासाठी धडाच आहे,’’ असे कोहलीने सांगितले. श्रेयसच्या दिमाखदार फलंदाजीमुळे सूर्यकुमार यादवची प्रतीक्षा वाढण्याची शक्यता आहे.
संघ
*भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, थंगरासू नटराजन.
* इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर.
रोहितला विश्रांती कधीपर्यंत?
डावखुरा सलामीवीर फलंदाज धवनला काही सामन्यांत अजमावण्यासाठी अनुभवी उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. परंतु धवन (१२ चेंडूंत ४ धावा) पूर्णत: अपयशी ठरला. त्यामुळे धवनवर कितपत विसंबून राहायचे, हा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागेल. दुखापतीतून सावरल्यावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर १४ दिवसांचे विलगीकरण केल्यावर तो सलग सहा कसोटी सामने खेळला आहे. आघाडीच्या फळीत रोहितची नितांत आवश्यकता आहे.