विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी, सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार?

जनदूत टिम    04-Feb-2021
Total Views |
मुंबई : विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील आपला बेस वाढवण्यासाठी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा‘ सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने पक्षसंघटना वाढवण्यावर भर दिला आहे. अशातच राज्यातील आघाडी सरकारने आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. आता कोरोनाचं संकटही थोड्याप्रमाणात कमी झालं आहे. त्यातच या वर्षभरात ठाकरे सरकारने केंद्र सरकारविरोधात अनेक विषयांवर वाद केला. शिवाय महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवत असल्याने राज्यात भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे.
 
Sharad-Pawar-Uddhav-Thack
 
पाच महापालिका निवडणुकीत भाजपला (BJP) पराजयाचा सामना करावा लागला तर त्याचा पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. तसं झाल्यास भाजपचे अनेक नेते दुसरा पर्याय म्हणून पक्षांतर करु शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने राज्यात कधीही ऑपरेशन लोट्स होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑपरेशन लोट्स होऊन राज्यात मध्यावधी झाल्यास त्याला समोरे जाण्यासाठी सज्ज असावं म्हणूनही राष्ट्रवादीने संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य पिंजून काढण्यास सुरुवात केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
 
दुसरीकडे राज्यातील अनेक महापालिका निवडणुकाएकट्याच्या भरवश्यावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्या काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसऐवजी शिवसेनेसोबत आघाडी करण्याचा विचार राष्ट्रवादी करत आहे. त्यासाठी राज्यातील पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यास राष्ट्रवादीने सुरुवात केली असल्याचा तर्क राजकीय सूत्रांनी दिला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवेसेनेचा घरोबा झाल्यास हा कायमचा घरोबा असेल अशी भिती असल्याने भाजपने शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
 
दरम्यान, ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’च्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या यात्रेतून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत असून इतर पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीत घेतलं जात आहे. पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादी आक्रमक झाल्याने आघाडीतही उलथापालथ सुरू झाली आहे. आघाडीतील पक्षांनीही आपला बेस वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील खातेबदल करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. राज्यातील पाच महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडीत ही उलथापालथ होत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.