मनसेला दुसरा झटकामंदार हळबे भाजपमध्ये

जनदूत टिम    02-Feb-2021
Total Views |
कल्याण : मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला खिंडार पडले आहे.
 
Raj-Thackeray-1_1 &n
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते आहेत. त्यांनी केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं आहे. दहा वर्षांपासून ते नगरसेवक आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप मंदार हळबे यांच्या संपर्क साधत असल्याचं बोललं जातं. त्यामुळे मंदार हळबेंना तातडीने ‘कृष्णकुंज’वर पाचारण करण्यात आलं होतं. परंतु हळबेंनी भाजप प्रवेश केल्याचं वृत्त धडकलं.
 
कोण आहेत मंदार हळबे?
मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते
केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं
मंदार हळबे दहा वर्षांपासून कल्याणचे नगरसेवक
एकमेव आमदाराची कृष्णकुंजवर धाव
राजेश कदम आणि मंदार हळबे यांच्या पक्षांतरानंतर मनसे नेत्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण पसरल्याचं दिसत आहे. कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागल्यानंतर पक्षाच्या एकमेव आमदाराने कृष्णकुंजवर धाव घेतली. राजू पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली.
 
पक्षाबद्दल कुठलीही नाराजी नाही
लहानपणापासून भाजपसाठी काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रेरित झालो. देवेंद्र फडणवीस यांचे कामही प्रभावी आहे. राम मंदिर उभारणीच्या कामापासून आपण काहीसे दूर राहत असल्याची भावना होती. सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी भाजपप्रवेश करत असल्याचं मंदार हळबे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ शी बोलताना सांगितलं. दहा वर्ष ज्या पक्षाने नेतृत्वाची संधी दिली, त्या पक्षाबद्दल कुठलीही नाराजी नाही, असं हळबेंनी स्पष्ट केलं.
 
राजेश कदम शिवसेनेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम हे ना आमदार आहेत, ना नगरसेवक, तरीही थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश झाल्याने, राजेश कदम यांची कल्याण डोंबिवलीत किती ताकद असू शकते, याचा अंदाज बांधता येईल. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.