ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व मच्छीमारांना मदत द्या – आमदार विनोद निकोले

जनदूत टिम    04-Dec-2021
Total Views |
मुंबई / डहाणू : ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व मच्छीमारांना मदत करा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी ई-मेल द्वारे निवेदन पाठवून मुख्यमंत्री, कृषी मंत्री, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री यांच्या कडे केली आहे.
 
niokle_1  H x W
 
यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, अरबी समुद्रामध्ये दि. 30 नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. दि. 01 डिसेंबरला त्याची तीव्रता वाढल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर कमी जास्त राहणार आहे, आणि आणखी दोन दिवस तरी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाळी वातावरण राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांत आणखी एक-दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून राज्यातील ग्रामीण भागातही शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे नुकसान झाले आहे.
 
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पालघर जिल्ह्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांचे तात्काळ पंचनामे करावे. तसेच किनारपट्टीवरील गावांमध्ये कोळी समुदायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यात सुकी मच्छी ओली झाली आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत केली जाते, त्याचप्रमाणे मच्छीमार हा सुद्धा एक शेतकरीच आहे, त्यांना देखील मदत मिळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व मच्छीमारांना मदत करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी ई-मेल द्वारे निवेदन पाठवून मुख्यमंत्री, कृषी मंत्री, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री तसेच संबंधित विभागाचे सचिव व प्रधान सचिव व जिल्हाधिकारी पालघर यांच्या कडे केली आहे.