अखेर पत्रकारीतेला १५ वर्षे पूर्ण!

जनदूत टिम    04-Dec-2021
Total Views |

  • रमेश भेरे यांचा खडतर प्रवास कसा झाला आवश्य वाचा!

प्रतिनिधी
शहापुर : आयुष्याला कलाटणी मिळायला फक्त एका संधीची गरज असते. संधीचे सोने करुन स्वतःच्या जीवनातील गतिरोधक गुणांचा किल्ला काढून स्वतःला घडवितो तोच स्वतःचाच आदर्श प्रतिमेचा शिल्पकार ठरतो. असच काही रमेश भेरे यांच्या बाबतीत घडलं. रमेश भेरे यांचे शिक्षण पदवीधर असून पत्रकारितेचा कोर्स ठाणे येथे करुन ते आज साप्ताहिक पेपर वरुन दैनिकाचे संपादक बनले. ज्यांनी शहापूर तालुक्याची राखाडी मुंबईला जाऊन विकली असा हा अष्टपैलू नेतृत्व गुण असलेला युवक की, ज्याच्या अंगी सर्व गुण आहेत. या अगोदर व्यसनाधीन झालेला रमेश भेरे हा गायक, कलाकार, किर्तनकार, प्रवचनकार, आदर्श वक्ता, आदर्श पत्रकार हे सर्व गुण संपन्न रमेश भेरे यांच्या अंगी पहायला मिळतात.

bhere_1  H x W:
 
जवळ जवळ १०० पुरस्कार प्राप्त केलेला हा माणूस अजूनही जमिनीवरच आहे. मला ज्यांनी मोठे केले ते समाजाने मोठे केले आहे. त्या समाजाचा मी आयुष्यभर ऋणी आहे. ज्यांना वाया गेलेली केस म्हणून समाजाने, शहराने बहिष्कृत करुन उकिरडयावर फेकले. त्यांनीच स्वसाक्षात्काराने पेटून फिनिक्स पक्षाप्रमाणे राख झटकून उंच भरारी घेतली की उपहास करणाऱ्या व्यक्तिंच्याही माना त्यांच्याकडे बघताना दुखून येतात. स्पष्ट वर्तृत्व व प्रखर नेतृत्व दांडगा जनसंपर्क आणि गायनाच्या अंगामुळे भेरे सर्वज्ञात होते. महाविद्यालय दशेतील त्यांचा आक्रमक वावर बघून स्थानिक राज्यकर्त्यांनी त्यांचा करायला सुरुवात केली. सभा, भाषणे, निवडणुका प्रचारातून भेरेंचा वापर लाऊडस्पीकरप्रमाणे वापर केला. राजकीय लोकांशी सलगी झाल्यावर भेरेंनाही तरंगल्यासारखं वाटू लागले. त्या नशेचे रुपांतर हळूहळू व्यसनात झाले. भेरेंनी शहापूरपासून मुंबई पर्यंतचे सर्व दारुचे गुत्ते, बार धुंडून काढले. सोबतीला मटका, जुगाराचाही नाद होताच, एवढ अष्टपैलू व्यक्तिमत्व रसातळाला जाताना पाहून त्यांच्या आई वडिलांच्या काळजात कालवाकालव व्हायची.
 
बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील साहेबांनी दारुच्या पायी विकून खाल्ली तरीही त्या देवीने एवढया वादळाशी संसाराची धुरा सोडली नाही. दारुपायी लोकांच्या वाढलेल्या उधाऱ्यांपासून तोंड लपवावे लागत असे. परंतु वडिलांनी त्यांना सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील शिवशक्त सर्जेमामा यांच्याकडे नेले व त्यांनी त्यांच्या हातून माळ घातली. नंतर खऱ्या अर्थाने सत्मार्गाला सुरुवात झाली. दारुपायी वाढलेल्या उधाऱ्या कशा फेडायच्या यासाठी त्यांनी खोपोली गाठली व तेथे एका मंदिरामध्ये राहू लागले. खोपोलीत ते महाराज म्हणून प्रसिध्द झाले. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना ते भाकीत सांगू लागले. आपल्या अमोध वक्तव्याने मोहून घेत. त्यातून मिळणाऱ्या दक्षिणेतून सारी उधारी चुकती झाली. भजन गाण्याची आईवडिलांची इच्छा होती. आपल्या मुलानेही किर्तनकार व्हावे हे स्वप्न होते. आत्मभानावर आलेल्या भेरेंनी आळंदीवरुन काही अध्यात्मिक पुस्तके आणून वाचली व किर्तनाद्वारे अंधश्रध्दा निर्मुलनाची मशाल हाती घेवून सारा समाज प्रवाहित करण्याचा वसा घेतला. त्यांच्या मते समाज वाईट नसतो. वाईट असतो तो आपण आपल्या भल्याबुऱ्या वर्तनावर समाजाचा सहभाग अवलंबून असतो. भेरेंच्या सुधारित आवृत्तीमुळे वाल्याचा झालेल्या वाल्मिकी उक्तीचा समाजाने सन्मानाने स्वागत केले.
आज समाजात ते प्रसिध्द प्रवचनकार, गायक, हार्मोनियम वादक म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांच्या सांगाबाई बेणुकुठे वाजला सान्या भक्तांचा देव निळकंठेश्वर या ध्वनीफिती प्रसिध्दी आहेत.
 
समाजाचे प्रबोधन करतानाच त्यांना न्याय द्यावा म्हणून पुढे ते पत्रकार झाले. लेखणीच्या बळावर अन्याय करणाऱ्या मदमस्त अधिकारी व गर्मीदार राज्यकर्त्यांना त्यांनी वठणीवर आणले. त्यांच्या निर्भिडपणामुळे मंत्रालयवार्ता यांनी त्यांना राष्ट्रभूषण पुरस्कार दिला तसेच जय मल्हार युवा प्रतिष्ठान, कल्याण यांनी त्यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आता लग्नाच्या एकवीस वर्षांनंतर त्यांना कन्या रत्नाचा लाभ झाला. ती मुलगी म्हणजे त्यांच्या सर्व सुखाचा केंद्रबिंदू आहे. भेरेंच्या घरात व समाजात त्यांना मानाचे स्थान लाभले अशा आगीत तापून निघालेल्या सोन्याचा अभिमान कुणाला वाटणार नाही. दैनिक ग्रामीण विचाराचे आज ते संपादक झाले असून आजही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!