विरचक्र विजेते 'अभिनंदन' यांचे अभिनंदन!

- श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे    23-Nov-2021
Total Views |
भारतीय हवाई दलातील अधिकारी वर्धमान अभिनंदन यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च विरचक्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात अभिनंदन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपतींच्या हस्ते देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना विरचक्र या पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार अभिनंदन यांना मिळाला आहे.
 
Abhinanda_1  H
 
अभिनंदन यांना हा पुरस्कार मिळाला ते योग्यच झाले या पुरस्काराचे ते खरेखुरे मानकरी आहेत. त्यांच्या कामगिरीने देशाची मान उंचावली आहे. २०१९ साली भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी आकाशात जी डॉग फाईट झाली होती त्यात अभिनंदन यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ फायटर विमान पाडले होते त्यावेळी ते एकदम प्रकाश झोतात आले. पाकिस्तानी दाहशतवाद्यांनी पुलवामा येथील लष्कराच्या तळावर मोठा हल्ला केला होता तेंव्हा देशभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेचा प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न भारत करीत होता.
 
भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी बालाकोटमधील दहशतवादी तळावर हल्ला केला पाकिस्ताननेही त्याला प्रतिउत्तर दिले. पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी २७ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला भारतीय हवाई दलाला याची चाहूल लागताच त्यांनी त्याला प्रतिउत्तर दिले. भारतीय हवाई दलाने पाकच्या विमानांना परतवून लावले. पाकिस्तानी विमाने आणि भारतीय विमाने आकाशात समोरासमोर आले. या पाकिस्तानी एफ १६ हे फायटर विमान अभिनंदन यांनी अचूक मारा करून पाडले.
 
या झटापटीत पाकिस्तानी विमानाने डागलेले एमरॉन मिसाईल अभिनंदन यांच्या मिग २१ बायसन या विमानाला धडकले. त्यामुळे अभिनंदन यांचे मिग २१ विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडले. पण अभिनंदन यांनी पॅराशूटच्या साहाय्याने स्वतःचा बचाव केला. पण ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. त्यामुळे ते अभिनंदन यांचे बरेवाईट करू शकतात अशी भारतीयांना वाटली. साहजिकच अभिनंदन यांना भारतात सुखरूप आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव टाकला. आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही पाकिस्तानवर दबाव आणला जात होता. परिणामी अभिनंदन यांना भारतात सोडण्यास पाकिस्तान राजी झाली. मात्र अभिनंदन यांच्यावर पाकिस्तानमध्ये ओढवलेल्या परिस्थितीने सर्वांचीच गाळण उडाली होती. पाकिस्तानच्या हाती लागूनही अभिनंदन यांनी कणखरतेचे दर्शन घडवले होते. पाकिस्तानला देशासंबंधी कोणतीही संवेदनशील माहिती त्यांनी कळू दिली नव्हती हे विशेष. साक्षात मृत्यू समोर दिसत असताना त्यांनी पाकिस्तानपुढे नांगी टाकली नाही त्यांच्या याच शौर्याबद्दल त्यांना विरचक्रने गौरविण्यात आले आहे. विरचक्र विजेते 'अभिनंदन' यांचे अभिनंदन!