मच्छिमारांचे झुंजार नेतृत्व हरपले : आ. रमेशदादा पाटील

जनदूत टिम    22-Nov-2021
Total Views |
पालघर : काल मच्छिमार समाजाचे ज्येष्ठ नेते पालघर जिल्ह्याचे सुपुत्र व एनएफएफचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नरेंद्र पाटील यांचे वयाच्या 70 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचे आमदार रमेशदादा पाटील यांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना कोळी महासंघ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
 
Narendra_1  H x
 
मा. नरेंद्र पाटील हे मच्छीमारांच्या उन्नती करता गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते. त्यांनी डब्ल्यूएफएफ या जागतिक मच्छीमार संस्थेचे सदस्य, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघाचे कार्यकारिणी सदस्य, अखिल वैती समाज संस्थेचे अध्यक्ष, सोनोपंत दांडेकर शिक्षण समितीचे उपाध्यक्ष, सातपाटी गावचे सरपंच अशी अनेक पदे भूषवली आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी मच्छिमार समाजाचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मच्छीमारांच्या अनेक समस्यांबाबत व प्रश्नासंदर्भात यांनी राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या जीवनाचे मुख्य ध्येय मच्छीमारांचा विकास करणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हेच होते.
 
यावेळी आमदार रमेशदादा पाटील यांनी मा. नरेंद्र पाटील हे मच्छिमार समाजाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी मच्छीमारांसाठी जागतिक पातळीपर्यंत काम केले हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. त्यांनी आपले सर्व जीवन मच्छिमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी घालवले. मच्छीमारांचा विकास करणे, त्यांची उन्नती करणे हा त्यांचा ध्यास होता. पालघर जिल्ह्यातील सातपाटी बंदर हे मा. नरेंद्र पाटील यांच्यामुळेच प्रसिद्ध झाले. आज त्यांच्या जाण्याने मच्छीमार समाजाचे व पालघर जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले असल्याचे सांगून मच्छीमारांचा हिरा काळाच्या पडद्याआड गेला असल्याच्या भावना आमदार रमेशदादा पाटील यांनी व्यक्त केल्या.