सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करणाऱ्या भाजपला सत्तेतून हद्दपार करा

जनदूत टिम    21-Nov-2021
Total Views |

  • काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राम पाटील यांचे आवाहन

वसई: स्वतःच्या आणि मर्जीतील उद्योगपतींच्या तिजोऱ्या भरण्यासाठी कृत्रिम महागाई वाढवून सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल करणाऱ्या जुलमी भाजप सरकारला केंद्रातील सत्तेतून हद्दपार करा असे आवाहन काँग्रेसचे वसई तालुका ग्रामीण अध्यक्ष राम पाटील यांनी शनिवारी वसईत एका सभेत केले.
 
vasai4_1  H x W
 
इंधन, गॅस,खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तू आदींच्या भरमसाठ वाढलेल्या किमती,कामगार आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे कायदे,महागाईच्या भस्मासुराने त्रस्त जनता, आदी विषय घेऊन केंद्रातील भाजप सरकार विरोधात जनजागरण अभियान सुरू असून वसईच्या ग्रामीण भागातील उसगाव ताडपाडा येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी राम पाटील उपस्थित नागरिकाना संबोधित करताना बोलत होते. पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे पालघर जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष पुंडलिक घरत, ज्येष्ठ काँग्रेस नेते कैलास पाटील, दिनेश पाटील आदी या जनजागरण अभियानासाठी प्रभारी म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रभारी पुंडलिक घरत कैलास पाटील यांनी जनजागरण अभियानामागील काँग्रेस पक्षाचा उद्देश पटवून देत मोदी सरकारचा फोलपणा व महागाईला जबाबदार ठरवीत भाजप सरकारचा नाकर्तेपणा व फसवेगिरी जनतेसमोर मांडली
 
वसई तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राम पाटील यांनी वसई तालुक्याच्या ग्रामीण भागातील काँग्रेस पक्षाचे योगदान व कार्य यांचा ऊहापोह करताना ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या प्रयत्नाचा उल्लेख केला. १९ नोव्हेंबर हा दिवस किसान विजय दिवस म्हणून साजरा करून किसान एकजुटीचा विजय म्हणून ३ काळे कायदे मागे घ्यायला केंद्र सरकारला भाग पाडणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करून या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना कँडल मार्च द्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यक्रमासाठी अल्पसंख्याक विभागाचे अश्रफ अली, युवक काँग्रेसचे संदीप कनोजिया, प्रिन्सली घोणसालविस, संजय वाघ प्रसाद चव्हाण, दिलीप भोईर यासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.