सुधागड तालुक्यात एक कोटी 14 लाखांचा दरोडा टाकल्या प्रकरणी 2 आरोपींना 6 वर्षांची सक्तमजुरी व दंड

भूषण सुतार    21-Nov-2021
Total Views |

  • माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पाली/गोमाशी: सुधागड तालुक्यातील धोंडसे गावाच्या हद्दीत दळवी फार्महाऊस येथे 15 मार्च 2016 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास 6 जणांनी दरोडा टाकला होता. या दरोड्यात एक कोटी 14 लाखांची रोख रक्कम व मुद्देमाल चोरण्यात आला होता. यातील 2 आरोपींना माणगाव सत्र न्यायालयाने शुक्रवारी (ता.19) 6 वर्षांची सक्तमजुरी व दंड ठोठावला आहे. या प्रकरणात माणगाव येथील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. जितेंद्र म्हात्रे यांनी युक्तिवाद केला.
 
sudha44_1  H x
 
या घटनेची सविस्तर हकीकत अशी की यातील फिर्यादी रमेश भिकमचंद परमार व इतर चार व्यापारी यांच्याकडे आरोपी नंबर एक विनोद विष्णू गुडेकर व इतर 8 आरोपींपैकी आरोपी हरिश्‍चंद्र गुडेकर याने सोन्याची देवाण-घेवाण करण्याचा व्यवहार करण्यासाठी व सोन्याचे बदल्यात रोख रक्कम देण्याचे ठरवले होते. त्यानंतर आरोपींनी आपसात कट रचून रमेश भिकमचंद परमार व साक्षीदार हे सोन्याच्या खरेदीसाठी आले असता त्यांना या आरोपींनी घातक शस्त्राने मारहाण करून गंभीर व साध्या दुखापती केल्या. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचे हात पाय रस्सीने बांधून त्यांच्याकडील रोख रक्कम एक कोटी 14 लाख रुपये व सोन्याची चैन, हातातील घड्याळ व मोबाईल फोन गाड्यांच्या चाव्या काढून रूम मध्ये बंद करून दरोडा टाकला होता.
 
या घटनेची फिर्याद पाली पोलिसांनी घेतली. गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पाली पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केला व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी सत्र न्यायालय माणगाव, रायगड येथे झाली. या खटल्यामध्ये सहा. सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासले व न्यायालयासमोर प्रभावीपणे युक्तिवाद केला. तसेच सदर काम करत असताना पोलीस सब. इन्स्पेक्टर यू. एल. धुमास्कर, पोलीस हवालदार छाया कोपनर, शशिकांत कासार व शशिकांत गोविलकर, पोलीस शिपाई सुनील गोळे व शिपाई सोमनाथ ढाकणे यांनी मदत केली.
 
अभियोग पक्षाने कोर्टासमोर प्रभावीपणे केलेला युक्तिवाद व साक्षी पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्यानंतर माणगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एस कोले यांनी आरोपी एक विनोद विष्णू गुडेकर व संतोष तुकाराम महाडिक यांस दोषी ठरवून भादवि कलम 395 अन्वये सहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली व उर्वरित आरोपींना निर्दोष मुक्त केले.