भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित

जनदूत टिम    18-Oct-2021
Total Views |
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची नुकतीच सांगता झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होईल की नाही या बद्दल क्रिकेटप्रेमींच्या मनात साशंकता होती पण बीसीसीआयने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले याचे सर्व श्रेय बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्यांच्या सर्व टीमचे आहे याबाबत त्यांना पैकीच्या पैकी गुण द्यावे लागेल.

ipl_1  H x W: 0 
 
अपेक्षेप्रमाणे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंगने चौथ्या वेळी आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. चेन्नई सुपरकिंग ने यावेळी एकहाती वर्चस्व गाजवले असले तरी या स्पर्धेत नवोदित युवा खेळाडूंनीही आपला ठसा उमटवला. या स्पर्धेत सर्वच संघातील नवोदितांनी त्यांच्या संघातील प्रमुख खेळाडूंपेक्षा भरीव कामगिरी करून आपली गुणवत्ता सिद्ध केली. ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडीकल, ईशान किशान, राहुल तेवतीया, सुर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, वरुन चक्रवर्ती, हर्षल पटेल, आवेश खान, हर्षदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, चेतन सकारिया या युवा खेळाडूंनी सुरेख कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएलमुळेच हे दर्जेदार युवा खेळाडू गवसले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
चेन्नई सुपरकिंगचा युवा सलामीवर ऋतुराज गायकवाडने तर या हंगामात कमाल केली. ऋतुराजने सर्वाधिक ६३५ धावा फटकावत ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले. रॉयल चॅलेंज बंगळुरूच्यव दीपक पडीकलने गेल्या मोसमाप्रमाणे या मोसमातही कोणताही दबाव न घेता सुरेख कामगिरी केली. मुंबई इंडियनचा सुर्यकुमार यादव, ईशान किशन यांनी आपल्या कामगिरीने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा युवा सलामीवर व्यंकटेश अय्यर याने तर आपल्या पहिल्याच आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी केली. सलामीला येऊन आक्रमक खेळणाऱ्या या युवा खेळाडूने सर्वांची वाहवा मिळवली. त्याच्या कामगिरीने अनेक आजी माजी भारतीय खेळाडू प्रभावित झाले आहेत. व्यंकटेश अय्यर मध्यमगती गोलंदाजीही करतो. त्याच्या कामगिरीने सुनील गावसकर इतके प्रभावित झाले की त्यांनी म्हटले, व्यंकटेश हा भारताचा भविष्यातील सुपरस्टार असून त्याच्याकडे चांगला अष्टपैलू खेळाडू बनण्याची क्षमता आहे. टी २० विश्वचषक संघात त्याला संधी मिळाली नसली तरी लवकरच तो भारतीय संघाकडून खेळताना दिसेल.
 
बीसीसीआयने त्याला मुख्य संघासोबत दुबईमध्येच थांबण्यास सांगितले आहे. पंजाबचा युवा तेज गोलंदाज अर्शदीप सिंग हा ही भारतीय संघात स्थान मिळवू शकेल असा गोलंदाज आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीने त्याने अनेकांची दांडी गुल केली. त्याच्या परफेक्ट यॉर्करची फलंदाजांनी धास्ती घेतली होती. उजव्या हाताचा जसप्रीत बुमराह व डाव्या हाताचा अर्शदीप सिंग ही जोडी भरताचीच नाही जगातील खतरनाक जोडी म्हणून भविष्यात गणली जाईल. रॉयल चॅलेंज बंगळुरू संघाचा तेज गोलंदाज हर्षल पटेलने तर सर्वाधिक ३२ विकेट घेत पर्पल कॅप मिळवली. दिल्ली कॅपिटलचा ओवेश खान या तेज गोलंदाजाने देखील लक्षवेधक कामगिरी केली. मुंबई इंडियनचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशान हा तर आता सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. छोट्या चणीचा हा फलंदाज मोठमोठे फटके मारण्यात तरबेज आहे.अतिशय वेगात धावा काढण्यात तो तरबेज आहे. शिवाय तो यष्टीरक्षकही आहे त्यामुळे भविष्यात तो महेंद्रसिंग धोनीची जागा घेऊ शकतो. राहुल तेवतीया हा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगची आठवण करून देतो.
 
मधल्या फळीत खेळणारा हा युवा फलंदाज या स्पर्धेद्वारे फिनिशर म्हणून उदयास आला. कमी चेंडूत जास्त धावा काढून आपल्या संघाला अशक्यप्राय विजय मिळवून देण्यात माहीर आहे. शिवाय तो डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करतो जमलेली जोडी फोडण्याची त्याची खासियत आहे शिवाय तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. याशिवाय रियान पराग, प्रियम गर्ग, नितीश राणा, राहुल त्रिपाठी यांनीही या स्पर्धेवर आपली छाप सोडली आहे. या युवा खेळाडूंची या स्पर्धेतील कामगिरी कौतुकास्पद आहे. केवळ हेच खेळाडू नाही तर शुभमन गिल, पृथ्वी शॉ, संजू सॅमसन, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, दीपक चहर, राहुल चहर, नवदीप सैनी, शिवम मावी, कमलेश नागरकोटी हे खेळाडू ज्या पद्धतीने खेळ करीत आहेत ते पाहता या खेळाडूंच्या हाती भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित असल्याची खात्री पटते. भारत हा गुणवंतांची खान असलेला देश आहे. केवळ शहरातूनच नव्हे तर ग्रामीण भागातूनही उदयोन्मुख खेळाडू पुढे येत आहे. या खेळाडूंमध्ये खूप गुणवत्ता आहे. आयपीएलमुळे या गुणवत्तेला न्याय मिळत आहे.
 
आयपीएलमुळेच भारताला रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, के एल राहुल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या असे मॅच विनर खेळाडू मिळाले आहेत. आयपीएलमुळे देशाला गुणवंत आणि दर्जेदार खेळाडू मिळत आहे हे मान्य करावेच लागेल.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५