मुजोर शिक्षणाधिकाऱ्याची बदली करा... ठाणे जिल्हा शिक्षक भारतीची मागणी...

जनदूत टिमरविंद्र पाळवी    16-Oct-2021
Total Views |
ठाणे: शिक्षक भारती ही सरकार मान्य संघटना आहे. शिक्षक भारती शहापूर तालुका अध्यक्ष राजेश विशे यांनी संघटनेच्या कामानिमित्ताने शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांना त्यांच्या कार्यालयात भेट दिली असता अपमानास्पद वागणूक दिली. तसेच, संघटना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अपशब्द, अशासकीय शब्दांचा वापर केल्याने शिक्षक भारतीने अशा मुजोर शिक्षणाधिका-याचा जाहीर निषेध केला आहे.
 
palvi4_1  H x W
 
त्यासाठी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोटे साहेब,( कोकण उपायुक्त) मा. पाटील मॅडम, जिल्हा परिषद, अध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्य यांच्या भेटी घेऊन निवेदने देऊन जाहीर निषेध केला. संघटनेच्या अजेंड्यावरील विषय अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. श्री अरुण विशे, प्रयोगशाळा परिचर, शेणवे विभाग हायस्कुल शेणवा येथे अतिरिक्त असल्याने समायोजन करण्यात आले आहे. ५ वर्षापासून पगारापासून वंचित असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर कर्मचाऱ्याला न्याय देताना राजेश विशे यांनी शिक्षणाधिकारी बडे यांची भेट घेतली होती. दरम्यान विशे यांचे नाव, शाळा लिहून घेवून तुम्हाला बघतो अशी धमकी सुद्धा दिली. संघटना माझ्यापेक्षा मोठी आहे का? संघटनेचे पदाधिकारी माझे बॉस आहेत का? अशी मुजोर भाषा सुद्धा वापरली.
 
दरम्यान जिल्हा परिषद वरीष्ठ पदाधिकारी यांनी फोन केले असता. कार्यालयातील फोन देखील न उचलता नंतर मोबाईलच बंद करून ठेवला. शिक्षक भारतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा व सदस्यांसमोर शिक्षण व्यवस्थेची कैफियत मांडली. अतिशय भ्रष्ट कारभार असून जिल्ह्यातील शिक्षक प्रचंड नाराज असल्याचे बोलले जाते. या शिक्षणाधिका-याच्या काळात १ उपशिक्षणाधिकारी, १ अधिक्षक व १ लिपीक अँटी करप्शन विभागाने निलंबित केले आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, विनाअनुदानावरून अनुदानावर बदली, शालार्थ आयडी, पवित्र पोर्टल शिक्षक मान्यता,मेडिकल बिल, सेवाजेष्ठता, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण, फंडाच्या पावत्या, पीएफ विनापरतावा, अतिरिक्त समायोजन असे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. प्रत्येक कामाचे बाजारभाव जगजाहीर असून कार्यालयातील अधिकृत व अनाधिकृत दलालांच्या माध्यमातून कामे होतात.
 
पैसे न दिल्यास शासनाने घालून दिलेल्या वेळेत ते काम न करता फाईल पेंडीग, त्रूटी व नकारात्मक शेरा मारून प्रकरणे नाकारली जातात. बऱ्याचवेळा फाईली गायब होतात. अशा अनेक तक्रारी जिल्ह्यातील शिक्षकांच्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्याची त्वरित बदली करण्याचा ठराव घ्यावा व संचालक व उपसंचालक यांच्याकडे बदलीसाठी प्रस्ताव पाठवावा अशी जोरदार मागणी शिक्षक भारतीने केली आहे. सदर शिक्षणाधिकारी बडे याची बदली न केल्यास शिक्षक भारती ठाणे जिल्हावतीने लवकरच जोरदार आंदोलन केले जाईल. असे शिक्षक भारतीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुरेश विशे, एकनाथ तारमळे, रविंद्र पालवी, किरण चव्हाण, राजेश विशे, जयवंत मोगरे, रविकिरण वेखंडे, नामदेव बांगर यांनी दिला आहे.