ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणार

01 Oct 2021 11:44:52

  • जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली शाळा सुरू करण्यास मान्यता

ठाणे: राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबर २०२१ पासून करण्यास आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान शाळा सुरू करताना कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश श्री.नार्वेकर यांनी संबंधिताना दिले.
 
rajesh_1  H x W
 
यावेळी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे तसेच नगरपंचायत नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे असल्याने ज्या शिक्षकांचे लसीकरण अद्यापही पूर्ण झालेले नाही अशा शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश श्री.नार्वेकर यांनी आरोग्य विभागास दिले.
 
तसेच शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांची साफ सफाई, सॅनिटायझर फवारणी तसेच स्वच्छताविषयक कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही श्री.नार्वेकर यांनी संबंधिताना दिले. प्रत्येक शाळेमध्ये शक्य असल्यास हेल्थक्लिनिक सुरु करावे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नियमितपणे तापमान तपासणे तसेच इतर आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा तयार ठेवाव्यात यासाठी शक्य असल्यास इच्छूक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. यासोबतच सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न करून हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर व परीचारीकांची मदत घेण्याच्या सूचनाही श्री.नार्वेकर यांनी संबंधिताना दिल्या.
Powered By Sangraha 9.0