ठाणे व मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजुरी

29 Jan 2021 13:49:58
मुंबई : ठाणे व मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राना मंजूरी देऊन त्वरीत निविदा प्रक्रिया करून काम चालू करण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.
 
thane mira025874_1 &
 
दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेल्या ठाणे व मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये या केंद्राची निर्मिती व्हावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. तसेच या वास्तूमध्ये विपश्यना केंद्र, लायब्ररी व राहण्याची व्यवस्था होणार असल्याने परगावाहून येणा-या आंबेडकरी अनुयायांना त्याचा फायदा होणार आहे. या दोन्हीं प्रस्तावाना मंजूरी देत असताना गरज पडल्यास या केंद्रांसाठी शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांनी दिली.
 
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरीत मंजूरी दिल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंडे यांचे आभार मानले. ठाणे महानगरपालिका हद्दीतील आनंद नगर येथील महानगरपालिकेच्या सुविधा भुखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार असून या कामी ९ कोटी ७५ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ९०% राज्य शासनाचा निधी उपलब्ध होणार असून १०% निधी हा ठाणे महानगरपालिकेने द्यावयाचा आहे.
 
ही वास्तू पुर्ण झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात राहणार असून त्याची निगा व देखभाल ठाणे महानगरपालिका करणार आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूरी ही दिलेली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील महसूल खात्याची जमिन सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात दिलेली असून त्याठिकाणी १३ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ९०% राज्य शासन व १०% खर्च हा मिरा-भाईंदर महानगरपालिका करणार असून त्यांचीही निगा व देखभाल वास्तू पुर्ण झाल्यानंतर मिरा-भाइर्दर महानगरपालिकेकडे सोपविण्याचा निर्णय झालेला आहे. तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही मंजूरी दिलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
 
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, दिनेश डिंगळे, मिरा-भाईंदर आयुक्त डॉ. विजय राठोड, सिटी इंजिनियर रविंद्र खडताळे, प्रादेशिक उपायुक्त कोकण श्रीमती. वंदना कोचुरे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0