ठाणे जिल्हा बँकेचे विभाजनाची मागणी नक्की कोणासाठी?

जनदूत टिम    27-Jan-2021
Total Views |

  • राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांचा बोलविता धनी कोण ?

येत्या मार्च महिन्याच्या 30 तारखेला होणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक रद्द करून बँकेचे विभाजन करण्याची मागणी करणारे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेते? प्रमोद हिंदुराव यांचा बोलविता धनी कोण ? अशी विचारणा होत आहे.

hinurao_1  H x
 
आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे प्रमोद हिंदुराव यांनी ठाणे जिल्हा बँकेचे विभाजन आणि चालू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली होती. सदर मागणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि सहकार विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली असून सध्याच्या परिस्थितीत बँकेची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने निवडणूक स्थगित करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सुद्धा हिंदूराव यांनी केली होती. सदर मागणी ही सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी फेटाळून लावली व त्यांनी विद्यमान संचालक मंडळाला बरखास्त करण्याचे कोणतेही ठोस कारण नसल्याचे स्पष्ट सांगितले.

fff_1  H x W: 0
 
राज्य शासनाने कोविड कालावधी मध्ये संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या दुहेरी कोंडीतून मार्ग काढणे शक्य नसल्याने प्रमोद हिंदुराव यांची मागणी सपशेल फेटाळून लावली आहे.

महा विकास आघाडीचे सरकार असताना या तीन पक्षांच्या कोणत्याही नेत्यांना ठाणे जिल्हा बँकेबाबत कोणतीही हरकत नसताना प्रमोद हिंदुराव यांना या विषयात इतका रस का ?असा सवाल विचारला जात आहे. या मागणीमागे करण्यामागे नक्की त्यांचा बोलविता धनी कोण? अशीही विचारणा होत असून तशी चर्चा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात रंगली आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकासात व आतापर्यंतच्या वाटचालीत कोणतीही ठोस भूमिका न बजावलेल्या प्रमोद हिंदुराव यांना जिल्हा बँकेबाबत शेतकऱ्यांची बँक म्हणून कोणतेही सोयर-सुतक नसून व्यवसायिक भागीदारीचे लागेबांधे जोपासण्यासाठी त्यांच्याकडून व ठाणे जिल्ह्यातील राजकारण्याकडून ठाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचा वापर करण्याची ही नेहमीची पद्धत आहे असेही बोलले जात आहे.

याबाबत प्रमोद हिंदुराव यांच्याशी आमच्या प्रतिनिधी ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.