शिवसृष्टीतून संस्कारीत होऊन त्यामधून नवीन पिढीने बोध आणि प्रेरणा घ्यावी---पालकमंत्री कु.आदिती तटकरे

जनदूत टिम    22-Jan-2021
Total Views |
अलिबाग : रोहे शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर महत्वाकांक्षी नदी संवर्धन प्रकल्पामध्ये साकारत असलेल्या शिवसृष्टीतून संस्कारीत होऊन त्यामधून नवीन पिढीने बोध आणि प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी (दि.21 जानेवारी ) रोहा येथे केले. रोहे शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर साकारत असलेल्या शिवसृष्टी भूमीपूजन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
aditi4478_1  H
 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.अमोल कोल्हे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रायगडचे खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, रोहा पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ, सुरेश लाड, मधुकर पाटील, विजयराव मोरे, विनोद पाशिलकर, अंकित साखरे, महेंद्र गुजर, रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने, पोलीस उपअधीक्षक किरण सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव,पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, अमित उकडे, रोहे अष्टमी नगरपरिषदेचे सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
 
पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, राज्यामध्ये शिवसृष्टीचे 4 प्रकल्प होणार आहेत. महाराष्ट्रातील 430 गडकिल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी प्राप्त व्हावा,यासाठी दोन्ही खासदारांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच पुरातत्व खात्याच्या अटीदेखील शिथिल होणे गरजेचे असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकही उभे करण्याचाही आपला मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रोहे शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर साकारत असलेल्या या शिवसृष्टीमुळे येथील पर्यटनवाढीस निश्चितच चालना मिळणार असून येथील नागरिकांच्या रोजगारवाढीसाठीही याचा नक्कीच लाभ मिळणार आहे.
 
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धन हा महत्वाचा विषय असून यासाठी केंद्र शासनाकडून अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यासाठी ठोस उपाययोजना महत्वाची असून प्रत्येक महसुली विभागात शिवसृष्टी व शंभूसृष्टी उभारली जावी, यासाठी राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री म्हणून ना. कु.आदिती तटकरेंनी विशेष प्रयत्न करावेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विविध माध्यमांतून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सर्व कटीबध्द आहोत, त्याकरिता आम्ही प्रयत्नशील राहू. तसेच लवकरच रोहा येथे शंभूसृष्टीही साकार होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इतर देशांपेक्षा भारताने व विशेषत: महाराष्ट्राने कोविडचा उत्तम मुकाबला केला असल्याचेही ते म्हणाले.
 
खासदार सुनिल तटकरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, रोहा-अष्टमी नगरपरिषद येथील कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत शिवसृष्टी ची उभारणी हा प्रकल्प 49 प्रकल्पांपैकी मंजूरी मिळालेला फक्त एकच महत्वांकाक्षी प्रकल्प असून येथे साकारत असलेला हा शिवसृष्टी प्रकल्प लवकरच पूर्णत्वाला जाईल. तसेच पुढील महिन्यात नदी संवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा मानस व्यक्त केला. भविष्यात रोहे शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देखील उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोहे शहरात नागरीकरण वाढत असताना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
 
आ.अनिकेत तटकरे यांनी आपल्या मनोगतामध्ये 21 जानेवारी या तारखेचे महत्व विषद केले. 21 व्या शतकातील 2021 साली 21 जानेवारी रोजी हा कार्यक्रम होत असल्याने व 21 हा आकडा शुभ असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात रोह्यात शंभूसृष्टी देखील उभारण्याचा मानस आ.अनिकेत तटकरेंनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजीमहाराजांचे पोवाडे गाऊन संपूर्ण वातावरण शिवमय करणारे शाहीर वैभव भगत व त्यांचे सहकारी तसेच या शिवसृष्टीचे वास्तुविशारद सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांचाही विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी केले. तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. समिरा गुजर यांनी केले. कार्यक्रमासाठी सौ. वेदांती तटकरे,सौ. पुजा पोटफोडे, सौ. प्रियांका पोटफोडे, श्री धावीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, सचिव मकरंद बारटके, जिल्हा शांतता समिती सदस्य प्रदीप देशमुख, उद्योजक ललित गुजर, विजय वारंगे, दिलीप तलवार, ज्येष्ठ मार्गदर्शक यदुरामभाऊ पडवळ,महंमद डबीर आदींसह तालुका व जिल्ह्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.