शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध- विधानसभा अध्यक्ष पटोले

जनदूत टिम    22-Jan-2021
Total Views |
ठाणे : पाडाळे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबादला वाटपाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक १० शेतकऱ्यांना पटोले यांच्याहस्ते धनादेश देण्यात आले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
nana patiole258741_1 
 
मुरबाड तालुक्यातील बांदलपाडा येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांसह पंचायत समिती सदस्य व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पटोले म्हणाले एखाद्या प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर तो प्रकल्प विहीत वेळेत पुर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यवस्थेमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. व्यवस्थेत बदल करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगून पटोले म्हणाले यामध्ये अपेक्षित बदल झालेतर एकही व्यक्ती त्यांच्या हक्काच्या लाभापासुन वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सुविधा निर्माण करण्याबरोबरच हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येईल. तसेच समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी जातीनिहाय जनगणनेसाठी आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले. मुरबाड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील तसेच पुर्नवसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवु असेही पटोले यांनी सांगितले. यावेळी खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे यांची भाषणे झाली.
 
कल्याण उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी प्रास्तविकात सांगितले की या कालव्यांचे काम सन २०११ मध्ये पूर्ण झाले असून ७ गावांतील बाधित शेतक-यांच्या जमीनीचा भूसंपादनाचा मोबदला देणेचा प्रश्न प्रलंबित होता.एकूण बाधित शेतकरी २८२ आहेत. पाटबंधारे विभागाने सदर जमिनींची थेट वाटाघाटीने खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव २०१७ मध्ये सादर करण्यात आला होता त्याअनुषंगाने दि.३० जून २०१८ रोजी प्राथमिक नोटीस आणि दि. डिसेंबर २०१८ रोजी अंतिम नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती.
 
जिल्हास्तरीय समितीने नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुर्दीनुसार सदर जमीनींचे खरेदींचे दर निश्चीत केले आहेत. पाटबंधारे विभागाने दिनांक २८ जुन २०२० रोजी रक्कम रुपये ११.८५ कोटीचा निधिक उपविभागीय अधिकारी (कल्याण) यांचे कार्यालयास उपलब्ध करुन दिला आहे.२८२ पैकी २१३ शेतक-यांनी जमीन खरेदी देण्यास तयार असलेबाबतचे विकल्प सादर केलेले आहे. पैकी ५३ खरेदीखतांची प्रक्रिया दुय्यम निबंधक (मुरबाड) यांचेकडेस सुरू करणेत आली आहे. त्यापैकी १८ शेतक-यांचे खरेदी खत पुर्ण झाले आहेत. उर्वरीत प्रगतीत आहेत.
 
१०१ शेतक-यांचे जमिनीबाबत वर्ग -२ जमीनी, आदिवासी जमीनी, वनजमीनी इतरअडचणी असल्याने सदर खरेदीखते प्रलंबित आहेत. ५९ जमिनीबाबत हरकती प्राप्त झाल्याने त्यांची सुनावणी घेऊन खरेदीखत करणेत येतील, अशी माहिती भांडे यांनी प्रास्तविकात दिली. आभार प्रदर्शन अभिजीत भांडे पाटील यांनी केले.