वेदमूर्ती विश्वनाथशास्त्री जोशी यांचे परलोकगमन

जनदूत टिम    21-Jan-2021
Total Views |
नगर : भारतवर्षातील शुक्ल यजुर्वेदाचे विद्वान घनपाठी वेदभास्कर प.पू. श्री विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी यांचे आज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर परलोकगमन केले. नगर शहरातील गायत्री मंदिरात २००६ साली झालेल्या घनपारायण सोहळ्याच्या नियोजनात त्यांचा उल्लेखनिय सहभाग होता. नेवासा येथील मोहिनीराज मंदिराच्या प्रांगणात सप्टेंबर २०१२ मध्ये वेदोपासक मयुर जोशी यांनी आयोजित केलेल्या महाविष्णूयाग सोहळ्याची पूर्णाहुती त्यांच्याच पावन उपस्थितीत झाली होती.
 
vedmurti5588_1  
 
गुरुजींचे जेष्ठ बंधू- भागवताचार्य बबन गुरू जोशी कार्लेकर यांनी वयाच्या नवव्या वर्षी गुरुजींना प्रवरासंगम येथे वेद अध्ययनासाठी आणले होते. प.पू.कै.श्रीकृष्णभट्ट गोडसे गुरुजींचे परमशिष्य जोशी गुरुजींनी आपल्या गुरुजींचा विद्यावंश वर्धिष्णू केला. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेचे असंख्य घनपाठी, क्रमपाठी, संहिता पाठी, कर्मकांड प्रवीण, विद्वान घडवून भावी काळासाठी एक महत्वपूर्ण भरीव कार्य केले. आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यापन कार्य केले.आपल्या गुरुकुलातील छात्रांना पोटच्या पुत्रापेक्षा अधिक स्नेह दिला. आई-वडिलांच्या ममतेपेक्षाही अत्याधिक प्रेम देवून सर्वार्थाने त्यांचे भरणं पोषणच नव्हे तर यशस्वी गृहस्थाश्रमाचा आरंभही करून दिला.
 
विद्वान शिष्यांच्या द्वारा काशीक्षेत्रापर्यंत संपूर्ण भारतभर घनपारायणमहोत्सव वैभवात संपन्न करवून वेदकार्याची ध्वजा फडकवली. पू.गुरुजींच्या वेदकार्याची दखल प्रत्यक्ष काशी विश्वनाथाने तर घेतलीच पण तत्कालीन राज्यपाल मा.कृष्णकांत यांच्या हस्ते प.पू.विश्वेश्वरशास्त्री एवं प.पू.गणेश्वरशास्त्री द्रविड बंधुद्वयांच्या संयोजनात साङ्गवेदविद्यालयात वेदरत्न पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. प.पू.गुरूजींनी अंतिम श्वासापर्यंत स्वयं तर वेदकार्य केले. तसेच विनायक आणि विवेक तथा गोविंद गुरु जोशी कार्लेकर, वे.मू. महेश रेखे, वे.मू.नरहरी जोशी, वे.मू. निलेश केदार, वे.मू. मधुर जोशी, वे.मू. देवेन्द्र गढीकर, वे.मू. सागर कुलकर्णी, वे.मू. अजय पाठक, वे.मू किरण पाठक, वे.मू श्रीराम जोशी, गाणपत्य वे.मू. निखिल प्रसादे आदि असंख्य घनपाठी छात्र घडवले. गुरुजींच्या इच्छेप्रमाणे किरण पाठक यांनी पुणे येथे पंचसंधिमालायुक्त घनपारायण पूर्ण केले होते. आळंदी येथे वेदपाठशाळेची मुहूर्तमेढ रोवून या वेदपाठशाळेचा सर्वदूर विस्तार करण्यासाठी जोशी गुरूजींनी अपार कष्ट सोसले.
 
जोशी गुरुजी हे मूळचे मराठवाड्यातील एरंडेश्वर या गावचे. परभणी जिल्ह्यातील रहिवासी. घरी परंपरेने पौरोहित्य. त्रिधाराक्षेत्रातील संत श्रीदेवांचा आशीर्वाद प्राप्त करुन त्यांनी वेदाचे साग्र अध्ययन पूर्ण केले. वेदमूर्ती गोडसे गुरुजी, वेदमूर्ती धायगुडेशास्त्री, वेदमूर्ती भानोसेशास्त्री आदींच्या सहवासात राहून वेदाध्ययन पूर्ण केले. अनेक परीक्षा दिल्या. आळंदी येथे अनेक विद्यार्थी घडविले. त्यांनी ३५ विद्यार्थ्यांना घनांत शिकविले. शतपथब्राह्मण ग्रंथाचेही ज्ञान विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थी घनपाठी झाला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असे. वेदोनारायणाची सेवा करताना आचारविचार कडकडीत पाळला. "आचारहीनं न पुनंति वेदाः |" या वचनावर त्यांचा ठाम विश्वास होता. संस्कृतचे ते चांगले जाणकार होते. श्रीडोंगरेशास्त्रींकडे त्यांनी पंचमहाकाव्य, तर्कसंग्रहदीपिका, न्यायमुक्तावली, मीमांसा, न्यायप्रकाश आदी ग्रंथ शिकले.
 
जोशी गुरुजी यांना शंभराचेवर पुरस्कार मिळाले. २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांनी वैदिक विद्यार्थी श्रीज्ञानोबारायांचा उपासक व वारकरी सांप्रदायिक जीवनव्रती बनविला. आळंदी क्षेत्र वैदिक विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने वाराणसी सारखे विद्याध्ययनाचे प्रमुख केंद्रस्थान बनविण्यासाठी गुरूजींनी मोठे योगदान दिले. धर्मशास्त्रीय व्यापक दृष्टिकोन, तत्संबंधी आग्रही परंतु समावेश गुरुजींची भुमिका होती. त्यांच्या जाण्याने वैदिक उपासना चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे.