राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्व मुंबईतील कोरोना योद्धांचा सत्कार

जनदूत टिम    18-Jan-2021
Total Views |
मुंबई : सेवेचे फळ मिळो वा न मिळो, भारतातील प्रत्येक व्यक्तीमध्ये करुणा, सेवा भाव व इतरांना मदत करण्याची भावना उपजत आहे. ‘सेवा परमो धर्म’ ही येथील शिकवण आहे. हा करुणा भाव व सेवाधर्म जोपासला तर आपण कोरोनापेक्षाही मोठ्या शत्रूला पराभूत करू शकू, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

rajyapal0259878_1 &n 
 
मुलुंड युवक प्रेरणा ट्रस्ट या संस्थेच्यावतीने कोरोना काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उत्तर पूर्व मुंबई उपनगरांतील २२ कोरोना योद्धांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खासदार मनोज कोटक तसेच कोरोना योद्धे उपस्थित होते.
 
कोरोना योद्धे पोलीस, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते यांनी केवळ ‘कार्यालयीन जबाबदारी’ या भावनेने काम न करता सेवाभावाने काम केले. ही भावना महत्वाची असते. आज अनेक लोक आपल्या कमाईचा काही भाग समाज कार्याला देतात. सेवा करणे काही लोकांच्या रक्तात असते. अशा लोकांना आपण वंदन करतो, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
 
राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ.विद्या ठाकूर, डॉ.सीमा मलिक, डॉ.काजोल बडवे, डॉ.रिता सिंग, डॉ.तेजल शहा, प्रशांत कदम, तौफिक तांबे, रत्नकांत जगताप, मनोज सोनी, बालकृष्ण बाने, हरेन मर्चंट, बिंदू त्रिवेदी, शिवशंकर कोचरेकर, प्रवीण कवाडे, नरेश दोशी, प्रितेश मैश्री, अशोक राय, किरण गैचोर, सुशिल सहानी, श्रीराम जंगम, नित्यानंद शर्मा, श्रीमती अश्विनी पांडे, यांना सन्मानित
करण्यात आले.