'पुस्तकांवर बोलू काही'

जनदूत टिम    17-Jan-2021
Total Views |

- कोमसाप वाचक मंचाची उंच झेप

पुस्तक वाचताना त्यात नवे काय आहे ते मी शोधत असतो. कधी अकराव्या बाराव्या शतकातील लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ तुम्ही बारकाईने वाचले तर त्यात काही गोष्टी अशा सापडतात, ज्या आजही कोणी लिहिल्या नाहीत. डॉ. र.म. शेजवलकर आपल्या भाषणात म्हणाले.

pustak0251_1  H 
 
'पुस्तकांवर बोलू काही' या कोमसापच्या बेचाळीस लेखकांनी लिहिलेल्या ८० पुस्तकांवरील आस्वादात्मक लेखसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षीय भाषण करत होते. सदर पुस्तकात परीक्षणासाठी लेखकांनी उत्तम पुस्तके निवडली आहेत असेही ते म्हणाले. या प्रकाशन प्रसंगी या पुस्तकाच्या संकलिका मेघना साने आणि प्रकाशक विवेक मेहेत्रे, वैशाली मेहेत्रे तसेच प्रमुख वक्त्या प्रा. दीपा ठाणेकर उपस्थित होत्या. सदर समारंभ 'सत्कार रेसिडेन्सी, ठाणे' या हॉटेलच्या 'प्रिम रोज' सभागृहात झाला.
 
पुस्तकाची संकल्पना स्पष्ट करताना संकलिका मेघना साने म्हणाल्या की, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एकत्रितपणे मराठी साहित्याचा एक प्रातिनिधिक ओघावता आढावा मिळावा,अशी पुस्तके आम्ही निवडली आहेत. प्रत्येक आस्वादक सुजाण आहे आणि त्याला साहित्यात गम्य आहे. त्यामुळे एक दर्जेदार लेख संग्रह आम्ही तयार करू शकलो. प्रकाशकांची उत्तम साथ मिळाली.
'पुस्तकांवर बोलू काही' या पुस्तकात १९४० ते २०२० मधील कथा, कादंबऱ्या, ललित, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने, आत्मचरित्र अशा अनेक विविध साहित्यप्रकारांतील पुस्तकांवर आस्वादात्मक लेख आहेत.
 
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाचक मंचात, दर तीन महिन्यांनी निरनिराळ्या पुस्तकांवर भाषणातून व्यक्त होण्याचा कार्यक्रम ठेवला जात असे. प्रत्येक वेळी हा कार्यक्रम वेगवेगळ्या वाचनालयात ठेवला जात होता. आता तीन वर्षे सातत्याने उपक्रम चालवून सभासद, परीक्षणात्मक लेखही लिहू लागलेत." असे संगीता कुलकर्णी यांनी निवेदनात विषद केले. प्रा. दीपा ठाणेकर या पुस्तकावर विवेचन करताना सर्व उपस्थित लेखकांचे अभिनंदन करून म्हणाल्या, "या पुस्तकाचा विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रबंधिका लिहीताना, नक्कीच फायदा होईल तसेच साहित्यरसिकांनाही हे पुस्तक वाचनीय वाटेल. अनेक साहित्यप्रकारांतील पुस्तकांवर लिहिलेलं आजचं लिखाण म्हणून याला संदर्भमूल्य आहे.
 
पुस्तकाच्या प्रत्यक्ष प्रकाशनानंतर विवेक मेहेत्रे यांनी या पुस्तकाचे किंडल बुक केले असल्याचे सांगितले. किंडल बुक हे रंगीत असून कोणत्याही देशात वाचता येण्याची सोय केली असल्याचे सांगितले. 'पुस्तकांवर बोलू काही' या पुस्तकाच्या किंडल बुकचे प्रकाशन प्रा. दीपा ठाणेकर, डॉ.शेजवलकर यांच्या हस्ते झाले. प्रकाशक विवेक मेहेत्रे यांनी, सध्याच्या ई -युगात, किंडल स्वरूपात किंवा पुस्तक विक्रेत्या वेबपोर्टल्सवर पुस्तक ठेवल्याने छापील पुस्तक विक्रीपेक्षा हे कसे अधिक सोयीचे, स्वस्त, जलद आणि सर्व जगातील वाचकांपर्यंत पोचण्याची क्षमता असलेले आहे हे सविस्तर सांगितले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. हे पसायदान  अमिताभ बच्चन यांच्या आवाजात (रेकॉर्डेड) होते. संक्रांतीनिमित्त सर्वांना तिळगुळ वाटून हा सर्वांगसुंदर कार्यक्रम संपन्न झाला.