पाली तहसील कार्यालयात बर्ड फ्ल्यू संदर्भात पोल्ट्री व्यवसाईकांबरोबर घेतली बैठक

जनदूत टिम    15-Jan-2021
Total Views |

तज्ञांनी खबरदारी व उपाययोजना करण्याचे केले आवाहन

पाली/गोमाशी : पाली तहसील कार्यालयात सुधागड तालुक्यातील सर्व पोल्ट्री चालक व मालक यांची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी (ता.14) संपन्न झाली. यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी बर्ड फ्लू व त्यासंदर्भात घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांची शास्त्रोक्त माहिती दिली. व खबरदारी व उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
 
pali meeting_1  
 
बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री व्यवसाय उध्वस्त होण्यापासुन वाचवा, व्यवसायिकांना या संदर्भात शास्त्रोक्त माहिती व उपाययोजना कळाव्यात आणि त्यांचे प्रबलन व्हावे या उद्देशाने या बैठकीचे आयोजन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले होते.
जिल्हा व तालुका प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत योग्य उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली. तसेच काही दिवसांत तालुक्यातील चिकन विक्रेत्यांची देखील अशाच स्वरूपाची बैठक आयोजित करणार असल्याचे रायन्नावार यांनी सांगितले. यावेळी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी सांगितले की नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे. पोल्ट्री व्यवसायाला बर्ड फ्लू चा जास्त धोका नाही.
 
मात्र तरीही पोल्ट्री व्यवसाईकांनी व तेथे काम करणाऱ्यांनी हातात ग्लोव्हज् न घालता मृत पक्ष्यांना स्पर्श करणे टाळा. हात वारंवार धुतले पाहिजेत. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे. पोल्ट्री शेड वर बाहेरील गाडी किंवा माणसे येण्यास मनाई करावी.आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.
 
कुक्कुटपालकांनी शेड व परिसर सोडियम हायपोक्लोराईड, चुना लावून निर्जंतुकीकरण करून जैवसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करावी. अतिरिक्त खबरदारीसाठी, कोंबडी किंवा कोंबडीशी संबंधित इतर उत्पादने हाताळताना चेहऱ्यावर मास्क आणि ग्लोव्हज वापरण्याची सवय लावा. पशु संवर्धन विभागाकडून योग्य उपायोजना व तरतुदी करण्यात आल्या आहेत. असे डॉ. प्रशांत कोकरे म्हणाले. तर एमकेएन कंपनीचे मालक मिलिंद मोंडकर म्हणाले की पोल्ट्री व्यवसाय बर्ड फ्ल्यू पासून सुरक्षित आहे. कोणीही घाबरून जाऊ नका. आम्ही लोकांना पौष्टीक खाद्य पुरवत आहोत. या बैठकीस तालुक्यातील सर्व पोल्ट्री व्यवसाईक उपस्थित होते.
 
१०० अंश सेल्सिअस तापमानात शिजवून कोंबडी मास व अंडी खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नये.
- डॉ. प्रशांत कोकरे, सुधागड तालुका पशुधन विकास अधिकारी