मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीचा लक्षांक वाढल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा - अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

12 Jan 2021 18:31:05
मुंबई : किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ साठी भारत सरकारने १५ लाख १८ हजार क्विंटल मका आणि २ लाख ५० हजार क्विंटल ज्वारी त्याचप्रमाणे ६० हजार क्विंटल पर्यंत बाजरी खरेदीसाठी राज्य सरकारला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Chagan Bhujbal012_1 
 
खरीप हंगाम २०२०-२१साठी किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत 4 लाख 4 हजार 900 क्विंटल मका, ९ हजार ५०० क्विंटल बाजरी तर १५ हजार ४३६ क्विंटल ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाने राज्य सरकारला मान्यता दिलेली होती. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनमार्फत राज्यात १२२ व आदिवासी विकास महामंडळामार्फत ५२ खरेदी केंद्रांद्वारे भरडधान्य खरेदी सुरू करण्यात आली होती.
मात्र राज्यात झालेल्या पीक पध्दतीतील बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका आणि बाजरीचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे खरीप हंगाम २०२०-२१ साठी भारत सरकारने दिलेले 4 लाख 4 हजार 900 क्विंटल मका आणि ९ हजार ५०० बाजरी खरेदीचे उद्दिष्ट्य दि. १४ डिसेंबर २०२० रोजी पूर्ण झाल्यामुळे १५ डिसेंबर २०२० पासून मका आणि बाजरीची खरेदी बंद झालेली होती.
राज्यातील शेतकऱ्यांची मका, ज्वारी आणि बाजरीची खरेदी अजून बाकी राहिल्यामुळे १५ लाख क्विंटल मका, २ लाख ५० हजार क्विंटल ज्वारी आणि १ लक्ष ७ हजार क्विंटल बाजरी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने केंद्र सरकारकडे मागणी केलेली होती.
राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका आणि बाजरीचे उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी राज्याला उद्दिष्ट वाढवून दिल्यामुळे कोरडवाहू खरिपाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भरड धान्य खरेदी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0