अचेतन मनाची अमर्याद शक्ति

प्रा. डॉ. रेणुका सुनील भावसार (बडवणे)     09-Sep-2020
Total Views |
तुज आहे तुजपाशी---
मन ही एक अशी गोष्ट आहे की जी दिसत नाही मात्र संपूर्णपणे तुमच्यावर ताबा ठेवते.बऱ्याचदा आपण म्हणतो 'मन के हारे हार है। मन के जितें जीत'। मनाच्या अमर्याद शक्तीवर विश्वास ठेवा तुम्हाला जे जे हवं होतं ते नशिबाने किंवा आपोआप मिळालेले नाही यावर विश्वास करा. कारण ते तुम्ही मिळवले ते तुमच्यातील अचेतन मनाकडून. तुम्ही या अचेतन मनावर भरपूर मेहनत घेतलेली असते, त्याकडे तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीविषयी वारंवार बोलत असता, स्वयंसूचना आणि चर्चा करता त्यामुळे आज जे जे तुमच्याकडे आहे ते प्राप्त करण्यामागे अचेतन मनाचा सिंहाचा वाटा असतो. आजपासून पुढे भविष्यात जे काही तुम्हाला मिळवायचे आहे त्यासाठी आतापासूनच अचेतन मनाकडे प्रामाणिकपणे प्रार्थना करा म्हणजे ते नक्की ते मिळेल व यासाठी अचेतन मनाच्या अपार शक्तीवर विनाअट विश्वास ठेवायला हवा.
 
Manashakti_1  H
 
"जरी सर्व परिस्थिती विरोधात असेल तरी तुम्हाला वाटते तसेच होईल असा ठाम विश्वास बाळगून कामाला लागला मग तुम्ही मागाल ते मिळवून देण्याची जबाबदारी अचेतन मनावर टाका तो ते सर्व बघून घेईल". एकदा माझ्या एका जवळची मैत्रिनीस डिप्रेशनचा त्रास वाढू लागला होता, जीवन नकोसे झाले होते, नैराश्यामुळे ती सतत एकांतात राहू लागली. भूतकाळात जाऊन जुने दुःख, अडचणी यांना आठवून सारखी दुखी होऊ लागली एकदा तिचा मला फोन आला आणि मला सांगू लागली की, मला जीवन नकोसे वाटते, जगण्यात काही अर्थ नाही, मी काहीच करू शकत नाही. असे बोलतच ती रडायला लागली, तेव्हा तिला मी म्हणाले माझा एक सल्ला ऐक आणि त्यावर मनापासून काम कर. सकाळी लवकर उठून फिरायला जा सकारात्मक लोकांमध्ये रहा आनंदी उत्साही सिनेमा बघ तुला आवडेल तो खेळ खेळत जा मुलांसोबत गप्पागोष्टी कर मजा कर स्वतःकडे लक्ष दे नवे कपडे घाल ड्रेसिंग चेंज कर हेअर स्टाईल बदल स्वयंपाक घरात नेहमीपेक्षा वेगळ्या डिशेस बनव उत्साही संगीत, गाणे ऐकत जा तुझ्या जीवनात पुन्हा आनंदाच्या लहरी येतील, यावर विश्वास ठेवा, आणि काळजी करू नकोस. असे सांगून फोन ठेवला आणि माझ्या चेतन मनाकडे तिच्यासाठी दररोज सकारात्मकपणे प्रार्थना सुरू केली. मी तिला जेवढ्या टिप्स दिल्या त्यापैकी तिने निम्म्या जरी सुरु केल्या तरी तिच्यात नक्कीच फरक पडणार होता. असे मला वाटत होते साधारणतः महिनाभराने तिचा मला फोन आला तिचा आवाज ऐकून मी आश्चर्यचकित झाले अतिशय उत्साहाने ती मला तिच्या जीवनात झालेल्या अमुलाग्र बदलाविषयी भरभरून बोलत होती. आणि मनापासून मला धन्यवाद देत होती. तेव्हा खरंच मी तिच्यासाठी काही केले का हा विचार माझ्या मनात आला आणि तिच्यातील बदलास ती स्वतः च जबाबदार आहे हा विचार चमकून गेला. त्यावेळी दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या त्या म्हणजे इतरांसाठी आपण अचेतन मनाकडून सतत देत असलेली सकारात्मक ऊर्जा व सूचना ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत गेली व समोरच्या व्यक्तीने ताणतणावातून बाहेर येण्यासाठी जाणीवपूर्वक अंगिकारलेल्या गोष्टी.
 
प्रयत्न, बदल याचा तिच्या जीवनावर झालेला सकारात्मक परिणाम हा मी सांगितलेल्या सूचनांमुळे ती त्यातून बाहेर आली का ? तर नाही तिने माझ्या सूचनांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि तिच्या अचेतन मनाने तिला जगण्यासाठी नवीन उभारी मिळवून दिली. "तुम्ही कोणत्याही संकटातून आजारातून अडचणीतून त्यामुळे बरे होत नसतात ज्यामुळे तुम्ही बरे झालात असे तुम्हाला वाटत असते, तर त्यामुळे तुम्हाला बरे वाटते या तुमच्या त्या गोष्टी वरील विश्वासामुळे तुम्ही बरे होत असता यावर विश्वास ठेवा" बरेचदा एखाद्या व्यक्तीची मनापासून काढलेली आठवण त्या व्यक्तीची अचानक भेट घडवून आणते, एखादा पदार्थ तीव्रतेने खाण्याची इच्छा मनात यावी आणि कुणीतरी तो पदार्थ तुम्हाला आणून द्यावा. यासारख्या असंख्य घटना आपल्या दैनंदिन जीवनात घडत असतात मात्र एक योगायोग समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु ती घटना अचेतन मनाशी निगडित आहे हेही तेवढेच सत्य आहे. काही महत्त्वपूर्ण टिप्स:हवे ते मिळविण्याची ताकद तुमच्या अंतरंगात पहात रहा.जगातील यशस्वी मानवांचे रहस्य म्हणजे त्यांच्या मनाच्या शक्तीशी संपर्क साधण्याची व तिला प्रवाहित करण्याची कुवत असते. तुमच्या सर्व समस्यांची उत्तरे तुमच्या मना जवळ आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करा. स्वयंसूचना सकारात्मक पद्धतीने करत राहा तुमचे अवचेतन मन तुमच्या शरीराचा निर्माण कर्ता आहे आणि तेच तुमच्या उपचार करू शकते. रात्री झोपताना आनंदी यशस्वी जीवनाविषयी परिपूर्ण आरोग्याविषयी विचार करीत झोपी जा तुमचे अवचेतन मन तुमच्या आज्ञेचे पालन करेल.प्रत्येक विचार म्हणजे एक कारण आहे आणि प्रत्येक परिस्थिती एक परिणाम तुम्हाला कोणतेही महत्त्वपूर्ण काम करायचे असेल तर तो विचार अतिशय तीव्रतेने मनापासून अचेतन मनात कळवा ते तुमच्या विचारांनूरूप तुम्हाला प्रतिसाद देईल.
 
तुम्ही विचार व प्रतिमांच्या रूपात अचेतन मनाला अचूक व योग्य आदेश द्यायला हवेत त्यानुसार ते तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी कामास लागते. मला शक्य नाही हे मी करू शकणार नाही असे उदगार कधीही काढू नका. कारण अचेतन मन तुमच्या प्रत्येक शब्द खरा करण्यास तत्पर असते म्हणून नेहमी म्हणत रहा की माझ्या अचेतन मनाच्या शक्तीच्या माध्यमातून मी सर्व काही करू शकतो. जीवनाचा नियम हा विश्वासाचा नियम आहे नकारात्मक गोष्टीवर विश्वास न ठेवता सकारात्मक प्रेरित करणारे उन्नती करणारे ताकत देणाऱ्या विचारांवर विश्वास ठेवून अचेतन मनास सूचना द्या. कारण विचार बदलले की नशीब आपोआप बदलते हा सृष्टीचा नियम आहे तुमचे अचेतन मन हे तुमच्या भावनांची बैठक आहे, ते सृजनात्मक मन आहे तुम्ही चांगला विचार केला तर चांगले होईल आणि वाईट विचार केलात तर वाईटच होईल महत्त्वाचा मुद्दा हा की तुमच्या अचेतन मनाने एखादी कल्पना स्वीकारली की ते लगेच अमलात आणायला सुरूवात करते म्हणून सतत सकारात्मक आणि योग्य हवे तेच बोला कारण "निसर्ग म्हणतो तथास्तु" असे आपण म्हणत असतो याचा मतितार्थ की जे बोलाल ते होईल, जे मागाल ते मिळेल फक्त हवे त्यात सातत्य, प्रामाणिकपणा, एकनिष्ठता या सर्वांचा योग्य रीतीने विचार करण्यास सुरुवात केल्यावर याचा अनुभव येऊ लागतो. काही बाबी घटना आपल्या हातात नसतात जसे की आपल्या आजूबाजूची माणसे, परिस्थिती ,वातावरण, आणि त्यामुळेही बऱ्याचदा आपण नकारात्मकते मध्ये जातो व त्याचे शिकार होऊ लागतो. कारण लहानपणापासूनच नकारात्मक सूचनांचा भडिमार आपल्यावर होऊ लागतो, त्यांचा विरोध कसा करायचा ही कला अवगत नसल्याने नकळतपणे अचेतन मनाद्वारे त्यांचा स्वीकार होतो व त्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो.
 
उदाहरणार्थ: तुला हे जमणार, नाही तू काहीच कामाचा नाही, तू ही करू शकत नाही, तू अपयशी होशील, तुला संधी मिळणार नाही, त्याचा काही उपयोग नाही, तू त्या योग्यतेचा नाही,जगात सर्वजण वाईट आहेत, तुझा निभाव कसा लागेल. अशा हजारो सूचनांचा आपण लहानपणापासून स्वीकार करत असतो व ऐकत असतो. म्हणजेच अप्रत्यक्षपणे त्यांचा स्वीकार करीत असतो. आणखी चांगले काय? हे सांगतात ते खरे की खोटे हे समजण्याच्या वयात तुम्ही नसतात. तसे पाहिले तर इतरांच्या सूचना असतात तुमची स्वतःची अशी काहीच ताकद नसते त्यांच्यात. तुमच्यातील असलेली शक्ती तुम्ही तुमच्या विचारांनी त्यांना दिली म्हणूनच त्या शक्तिशाली बनतात हे लक्षात ठेवा. व्यक्तीचे चेतन मन जे काही मान्य करते त्याचा स्वीकार अचेतन मन करते व त्यानुसार कार्य करीत असते.
 
तुम्ही ऐकलेल्या सूचनेला मानसिक संमती दिली, त्या विचाराला स्वीकारणे म्हणजे ती सूचना तुमचा स्वतःचा विचार बनून जाते. आणि मग तुमचे अचेतन मन त्या विचाराला स्वीकार करायला लागते. यात एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी ही आहे की, निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे मग तुम्ही आरोग्याला, प्रसिद्धीला, स्वप्नांना आणि महत्त्वाकांक्षेला निवडा तुमच्या अचेतन मनाने तुमच्यासाठी काम करावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला योग्य विनंती करायला हवी तरच ते योग्य ते सहकार्य करेल. लक्षात ठेवा की क्रिया आपण स्वतः स्वतःच्या व चेतन मनावर करीत आहोत संस्कार स्वतःवर स्वतःसोबत स्वतःमध्ये सकारात्मक यशस्वी बदलासाठी करीत आहोत, त्यामुळे या सूचना देताना तुमचा तुमच्या स्वतःवर प्रचंड विश्वास असणे गरजेचे आहे त्यासाठी काही वाक्य खालील प्रमाणे म्हणावयाची आहेत.
 
* या अपरंपार बुद्धिमत्तेने माझ्यात ही इच्छा निर्माण केली आहे तीच माझं बोट धरून मला सन्मार्ग दाखवते आणि माझ्या इच्छापूर्ती च्या योजना माझ्यासमोर उलगडून दाखवते.
 
* मला हे माहिती आहे की माझ्या अचेतन मनातील गहर विद्वत्ता आता मला प्रतिसाद देत आहे आणि मी माझ्या अंतरंगात अनुभवतो व ज्याचा दावा करतो त्याचीच बाह्य जगात अभिव्यक्ती होत असते.
 
* सर्वत्र संतुलन समता व समतोल आहे. या उलट जर नकारात्मक विचार केलं तर तुमचे अचेतन मन तुम्हाला कुठलाही प्रतिसाद देऊ शकणार नाही तुमच्या अचेतन मनाने तुमच्यासाठी काम करावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला योग्य विनंती करायला हवी तरच ते तुम्हाला योग्य सहकार्य करेल सर्व जग जिंकण्याची ताकद तुमच्यामध्येच आहे. हवे ते प्राप्त करून घेण्याची हिम्मत तुमच्यामध्ये आहे गरज आहे ती फक्त ही अचेतन मनाची शक्ती जाणून घेण्याची.
 
पुढील भागात आणखी काही महत्त्वपूर्ण अचेतन मनाचे रहस्य जाणून घेऊयात.
क्रमशः