मातोश्री उडवून देण्याची धमकी,दाऊदच्या हस्तकाचा दुबईतून फोन

जनदूत टिम    07-Sep-2020
Total Views |
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने याबाबतचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या मुख्यमंत्र्यांचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान असलेलं मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर येतं आहे. हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
dawood-cm-uddhav-thackera
 
मुंबईच्या क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 2 वाजता दुबईवरुन मातोश्रीवर एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. सध्या याबाबतची चौकशी सुरु आहे. “मला अजून याबाबतची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मी मुंबईतील अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती घेत आहे. अधिकृत माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही. पण शिवसैनिक म्हणून सांगतो, शिवसैनिकांचा श्रद्धास्थान असलेल्या, आमच्या शिवसैनिकांचं मातोश्री हे एक मंदिर आहे. तिथे धमकी देणारा जगाच्या पाठीवर माणूस जन्माला यायचा असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, माझे शिवसैनिक माझं सुरक्षाकवचं आहे. आम्ही देशभरातील शिवसैनिक मातोश्रीचं, उद्धव ठाकरेंचं, ठाकरे कुटुंबांचे त्यांचे रक्षण करु,” अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
 
“मातोश्रीला यापूर्वी अशा अनेक धमक्या आल्या. केसाला धक्का लावण्याची हिंमत नाही. शिवसैनिकांच्या छातीचा कोट करु आणि मातोश्री सुरक्षित राखू. अशा धमक्या भरपूर बघितल्या.उंदरासारखे बिळात लपून धमकी देणार आम्ही भरपूर पाहिले आहेत. पण सरकारनेही याबाबतची गंभीर दखल घेतली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस मातोश्रीचं, मुख्यमंत्र्यांचं, त्या मातोश्रीला लागून असलेल्या सर्वांचे रक्षण करतील. आमचा पूर्ण विश्वास आहे. कोणी काहीही बोलो, याची चौकशी नक्की होईल. फोन करुन घाबरवणं ही पहिली वेळ नाही. असे अनेकदा घडलं आहे. शिवसैनिकांची अभेद्य भिंत कायम त्यांच्यासोबत आहेत, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.