अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती.
कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनीदेखील कंगनाच्या या ट्विटवरून संताप व्यक्त केला आहे.
“या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात……निषेध,” असं म्हणत केदार शिंदे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्य केला होता. तर दुसरीकडे अभिनेता स्वप्नील जोशी यानंदेखील कंगनाच्या वक्तव्यावरून “आय लव मुंबई” असं ट्विट केलं आहे.
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं कंगना म्हणाली.