समाजकार्यासाठी मोदींनी दान केले १०३ कोटी रुपये

जनदूत टिम    04-Sep-2020
Total Views |
नवी दिल्ली : करोना संकटाला तोंड देण्यासाठी मार्च महिन्यात केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम केअर्स फंडमध्ये सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे. पीएम केअर्स फंडच्या ऑडिटमध्ये या खात्यात पहिली रक्कम ही दोन लाख २५ हजारांची होती आणि हे पैसे पंतप्रधान मोदींनी दिले होती अशी माहिती समोर आली आहे.
 
ModiPM-2_1  H x
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फंडाची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी स्वत:पासून याची सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त करत सव्वा दोन लाख रुपये दान म्हणून दिले. मात्र मोदींनी अशाप्रकारे दान देण्याची ही पहिलीच वेळ नसून आतापर्यंत मोदींनी समाजकार्यासाठी १०३ कोटी रुपये देणगी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनहिताच्या आणि समाजकार्याच्या कामासाठी अनेकदा मोठी रक्कम दान केली आहे. यामध्ये मुलींचे शिक्षण, नमामी गंगे, मागासलेल्या घटकांसाठीची विकास कामे यासाठी मोदींनी मोठ्या प्रमाणात पैसे दान केल्याची माहिती समोर आली आहे.
 
मुख्यमंत्री असल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजकार्यासाठी पैसे दान करत असून आतापर्यंत त्यांनी १०३ कोटी रुपये दान केले आहेत. ही रक्कम त्यांनी स्वत:च्या बचत खात्याबरोबरच वेगवगेळ्या व्यक्तींकडून भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून मिळालेल्या वस्तूंचा लिलाव करुन जमा केली होती यापूर्वी मोदींनी २०१९ साली पार पडलेल्या कुंभमेळ्यातील स्वच्छता कामगारांच्या कल्याणासाठी आपल्या वैयक्तिक बचतीमधून २१ लाखांचा निधी मदत म्हणून दिला होता. मागील वर्षी दक्षिण कोरियाने दिलेल्या सेऊल शांतता पुरस्काराची संपूर्ण रक्कम म्हणजेच १ कोटी ३० लाख रुपयांचा निधीही मोदींनी दान म्हणून दिला होता.
 
हा निधी त्यांनी नमामि गंगे या गंगा नदीच्या स्वच्छता प्रकल्पासाठी दिला. या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेल्या बक्षिसपात्र रक्कमेवर कर सवलत मिळावी यासाठी मोदींनी अर्थमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं. या रक्कमेबरोबरच मोदींनी पंतप्रधान म्हणून वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यांमध्ये मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचा लिलाव करुन मिळालेली रक्कमही नामामि गंगे मोहिमेसाठी दिल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
यापूर्वी मोदींनी २०१५ पर्यंत त्यांना मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून मिळालेल्या गोष्टींची सुरतमध्ये लिलाव केला होता. या लिलावातून आठ कोटी ३५ लाखांचा निधी गोळा झाला होता. नुकत्याच झालेल्या अन्य एका लिलावामध्ये तीन कोटी ४० लाखांचा निधी जमा झाला आहे. हे सर्व पैसेही मोदींनी समाजकार्यासाठी दान केले आहेत.