कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे निधन

जनदूत टिम    23-Sep-2020
Total Views |

कल्याण-डोंबिवलीतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून राजेंद्र देवळेकर यांची ओळख होती

कल्याण : कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर आणि शिवसेनेच ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचे बुधवारी निधन झाले.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर, माजी स्थायी समिती सभापती अशी महत्वाची पदे भूषवलेले माझे मित्र, कट्टर शिवसैनिक अतिशय अभ्यासू नगरसेवक म्हणजे राजू देवळेकर.

rajendra-devlekar_1 
 
राजूची दोन रूपं पाहण्याचं भाग्य मला मिळालं. त्याला समोरासमोर भेटलं तर सुहास्य वदने आणि मृदू भाषेत बोलणारा राजू महापालिकेच्या सभागृहात आक्रमक शैलीत, अभ्यासपूर्ण विवेचन करणारा आणि प्रशासनाची पोलखोल करणारा असा पूर्णपणे भिन्न अवतार पाहायला मिळायचा.
आदरणीय दिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेला राजू ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारा कडवट शिवसैनिक. २००५ ते २०१० या दरम्यान महापालिकेच्या सभागृहात आम्ही एकत्र काम केलंच पण कल्याण डोंबिवलीच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांसंबंधी अनेक व्यासपीठांवर आम्ही एकत्र आलो. आणि अर्थातच तत्कालीन राजकीय विचारसरणी एकच असल्याने समान वैचारिक धाग्याने जोडलो गेलो.
 
राजू देवळेकर म्हणजे केडीएमसीमधील विशेषतः कल्याणच्या नागरी समस्यांचा जाणकार म्हणून ख्याती होती. विनम्रपणे सामाजिक जीवनात कसे वावरायचे याचा वस्तुपाठच. दहा वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागला तरी त्याची कटुता मनात न ठेवता त्याने महापौरपदाच्या माध्यमातून कल्याणच्या विकासासाठी आपली कटिबद्धता जपली हे त्याचे स्वभाववैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
परमेश्वर या आमच्या जगन्मित्राच्या आत्म्याला सद्गती देवो हीच प्रार्थना आणि समस्त देवळेकर कुटुंबीय आणि शिवसैनिकांना या दुःखातून सावरण्याचे मनोबळ मिळो.....
ओम शांती शांती शांती.....