प्रार्थमीक आरोग्य उपकेंद्राच्या थडग्यांना पुनर्जीवन मिळेल का?

उमेश मारुती भेरे    15-Sep-2020
Total Views |
पेसा अंतर्गत येणाऱ्या शहापूर सारख्या आदिवासी तालुक्यात आजपर्यंत आरोग्य सुविधांची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.त्यातच तालुक्यातील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची अवस्था खूपच बिकट आहे. एकीकडे आदिवासी बहुलतालुका असल्यामुळे दारिद्य्र, अशिक्षितपणा आणि बेरोजगारी या समस्या कायमस्वरूपी आहेत.त्यासोबत आरोग्याच्या सुविधा नसल्याने तालुक्यात कुपोषण, साथीचे आजार किंवा अन्य आजारांनी ग्रासलेली आणि आरोग्य सुविधांची कमतरता असल्याने बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
 
Doctor_1  H x W
 
तालुक्याच्या मुख्यालयात उपजिल्हा रूग्णालयाचे फक्त थडगे बांधून ठेवले आहे. त्यात रुग्णांना इलाज मिळतं नाही, प्रसूतीसाठी एकतर जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवले जाते किंवा खाजगी दवाखान्यात धाडले जाते. प्रशासन हिटलरशाहीसारखे वागत असल्याने उपजिल्हा रुग्णालय स्मशान बनले आहे. गोरगरिबांना रात्री अपरात्री तालुक्यातील प्रार्थमीक आरोग्य केंद्रात खूप चांगले उपचार मिळतात. डॉक्टर किंवा इतर कर्मचारी ही रात्री अपरात्री कोरोना काळात ही रुग्णांची चांगली देखभाल घेताना दिसतात पण आरोग्य उपकेंद्र फक्त थडगे बनून का राहीलेय? किंवा त्याकडे फारसे लक्ष का दिले जात नाही हा नेहमीचा प्रश्न आहे. पूर्णवेळ डॉक्टर असणे अपेक्षित असताना उपकेँद्राना टाळे लागलेले बघायला मिळत आहे.
 
कोरोना काळात सर्वच आरोग्य अधिकारी - कर्मचारी खूप जीव लावून तसेच स्वतः चा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करताना दिसून येतात. पण शहापूर सारख्या दुर्गम भाग असलेल्या तालुक्यात शासनाने प्रचंड खर्च करून गरिबांना चोवीस तास आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून उपकेंद्राच्या इमारती उभारल्या, चोवीस तास आरोग्य कर्मचारी ही नियुक्त केले पण तरीही गोरगरिबांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. सध्या कोरोना असल्याने आरोग्य विभागावर अधिक ताण आहे. पण खाजगी दवाखान्यात रुग्णांना साधे तपासले ही जात नसल्यामुळे तसेच वाहतुकीची साधने बंद असल्याने रुग्णांना प्रार्थमीक आरोग्य उपकेंद्र मोठा आधार ठरू शकतो. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि पारीचारीका यांच्या खांद्यावर सध्या उपकेंद्राची धुरा आहे. त्यांच्या कामाचे स्वरूप बघता उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या अंदाजे बारा ते पंधरा गावांमध्ये महिन्यातून एकदा लसीकरण करण्याच्या कामात तसेच ममता दिवस किंवा इतर लसिकरणाच्या कामात पारीचारीका आणि इतर महिला आरोग्य कर्मचारी फिरत असतात.कोरोना काळात त्यांच्यावर ताण अधिक असतो. पण उपकेंद्रात बाह्य रुग्ण तपासणीसाठी डॉक्टर कमी असल्याने रुग्णांवर इलाज होत नाही. लसीकरण, गरोदर माता तपासणी तसेच बहुउद्देशीय आरोग्य सेवकांच्या कामाव्यतिरिक्त इतर रुग्णांवर इलाज होत नसल्याने उपकेंद्र सतत बंद आढळून येतात.
 
एक वर्षापूर्वी प्रत्येक प्रार्थमीक आरोग्य उपकेंद्रात एक CHO (Community Health Officer) म्हणजे सामुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या ट्रेनिंग नंतर हे डॉक्टर उपकेंद्रात हजर होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनाच्या काळात त्यांना हजर होऊ शकले नव्हते. सध्या शहापूर सोडून इतर तालुक्यात हे सामूदाय आरोग्य अधिकारी हजर झाले असून शहापूर तालुक्यात अजूनही उपकेंद्र थडगे बनून राहिले आहेत. CHO च्या नियुक्ती ने आरोग्य सेवा अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. त्यांच्या कामाचा चार्ट पाहता सकाळ पासून दुपार पर्यंत बाह्य रुग्ण तपासणी (OPD) आणि दुपार नंतर कार्यक्षेत्रात जाऊन तपासणी करणे असा आहे. या मुळे जनतेच्या आरोग्याच्या समस्या चांगल्या प्रकारे मिटू शकतात. आतापर्यंत जिल्हा परिषद कडून नेहमीच शहापूर तालुक्यावर अन्याय होत आला आहे. इतर तालुक्यात हे डॉक्टर कामावर रुजू झाले असून शहापूर तालूकात फक्त दोन ठिकाणी हे डॉक्टर रुजू झाले होते.कोरोना महामारी बघता यावर लवकरात लवकर अमलबजावणी होणे गरजेचे होते. या आठवड्यात ५२ उपकेंद्रापैकी २२ उपकेंद्रावर सामूदाय आरोग्य अधिकारी हजर झाल्याची माहिती आहे परंतु अजून ही कामावर रुजू झाल्याचे निदर्शनास येत नाही.
 
नियूक्त्या होऊन ही कामावर डॉक्टर रुजू का होत नाही किंवा फक्त शहापूर तालूक्यावरच असा अन्याय का व्हावा? याचे उत्तर जाणून घेतले असता सर्व डॉक्टर आपल्या सोयीने कामावर हजर होत आहेत.शहापूर तालुका दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी हे डॉक्टर जाने येणे दूर पडत असल्याने हजर होण्यास टाळाटाळ करीत असल्याने कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर अशा जवळच्या शहरी भागांत CHO कामावर रुजू झाल्याचे कारणं समोर येत आहे. यापैकी एका मोठ्या उपकेंद्रात CHO कामावर रुजू झालेत किंवा नाही याची पडताळणी केली असता कामकाजाच्या दिवसांत ही उपकेँद्राला टाळे असल्याचे निदर्शनास आले. त्याचे कारणं जाणून घेतले असता, फार्मासिस्ट आजारी असल्याने औषधांचा तुटवडा आहे आमी म्हणून उगाच येऊन बसण्यापेक्षा उपकेंद्र बंद ठेवले आहे असे कारणं समोर आले. म्हणजे भरपगारी दिवसांत औषधं पुरवठा झाला नाही त्याला जबाबदार कोण? आणि भरपगारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरी बसून उपकेंद्र बंद ठेवणे कुठपर्यंत योग्य आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळणे गरजेचे आहे.
 
कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून कामं केले आहे हे नाकारता येणार नाही. पण उपकेंद्र चोवीस तास उघडे ठेऊन रात्री अपरात्री आजारी होणाऱ्या रुग्णांच्या सेवेसाठी उघडे असावे ही माफक अपेक्षा आहे. भर दिवसा सुद्धा उपकेंद्राला टाळे दिसावे हे आरोग्य विभागाला आणि कोरोना महामारी बघता जनतेला हितकारक नाही. इतका खर्च करून उभी केलेली उपकेँद्राची इमारत थडगे बनून राहणे न शोभे ....!!!!