'कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीची आढावा बैठक - उपमुख्यमंत्री अजीत पवार

11 Sep 2020 21:07:56
पुणे : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी इथली परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे, असं सूचित केलं. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात तसंच उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
 
Ajit Pawar 0000214_1 
 
संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्ण दाखल होत आहेत. रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यासाठी शासकीय यंत्रणेनं पूर्ण क्षमतेनं काम करावं. राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागानं सक्रियपणे काम करावं. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी. पाचही जिल्ह्यात एकाच अधिकाऱ्यावर कामाचा ताण येऊ नये तसंच कामात गतीमानता येण्याच्या दृष्टीनं विषयनिहाय जबाबदाऱ्या सोपवून कामाचे विकेंद्रीकरण करावे. रुग्णाला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करावं.
 
ऑक्सिजन टँकरचा वाहतुकीदरम्यानचा वेळ वाचवण्यासाठी तसंच रुग्णालयात जलद गतीनं ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन टँकरला ॲम्ब्युलन्सप्रमाणे सायरनची व्यवस्था करुन घ्यावी. पोलीस विभागानं ऑक्सिजन टँकर मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरुन हे टँकर वाहतूक कोंडीतून जलद गतीनं बाहेर पडतील. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद, विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला व अन्य अधिकाऱ्यांनी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील ५० % निधी कोविड नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी वापरून प्रभावीपणे काम करावं. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळवून देण्याचं नियोजन करावं तसंच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याची खात्री करावी.
 
रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचं नियोजन दोन्ही महापालिकांनी करावं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ सप्टेंबरपासून राज्यभर ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेला सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावांमधील दक्षता समित्या व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावं.
 
Powered By Sangraha 9.0