पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३० तारखेपर्यंत बंदच राहणार

01 Sep 2020 21:07:43
पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी विठ्ठल मंदिर कधी खुले होणार, याची उत्कंठा लाखो वारकरी भाविकांना लागलेली असतानाच विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. मंदिर समितीच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांना आणखी महिनाभर विठ्ठलाच्या दर्शनासाठी वाट पाहावी लागणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगळवारी (ता. 1 सप्टेंबर) दिली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या साठी 22 मार्चपासून विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
 
Vithhal_1  H x
 
"अनलॉक चार'मध्ये धार्मिक स्थळे आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्यण राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार मंदिर समितीने आज पत्राद्वारे मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्यण जाहीर केला आहे. विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर खुले करावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 31 ऑगस्ट) वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात आंदोलन करण्यात आले होते. स्वतः आंबेडकर आणि त्यांच्यासोबतच्या 11 कार्यकर्त्यांना मुख दर्शनही दिले होते. आठ दिवसांनी मंदिर उघडले जाईल, असे सरकारच्या वतीने आश्वासन दिले होते. सरकारच्या या आश्वासनाला काही तास उलटून गेल्यानंतर लागलीच मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे वंचित आणि वारकरी संघटना काय भूमिका घेतात, याकडेच लक्ष लागले आहे. आंदोलनप्रकरणी प्रकाश आंबेडकरांसह बाराशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखलकोरोना विषाणूच्या अनुषंगाने लॉकडाउन प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असताना जमाव जमवणे, मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे, माऊली हळणवर यांच्यासह अकराशे ते बाराशे जणांवर पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे.
 
श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडावे, या मागणीसाठी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पंढरपुरात आंदोलन करण्यात आले होते. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने उपाय योजनांबाबत आदेश दिलेला आहे. असे असतानाही या आंदोलनाच्या वेळी जमाव गोळा झाला होता. आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे, धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, रेखा ठाकूर, नाम महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, गणेश महाराज शेटे, माउली हळणवर यांच्यासह इतर अकराशे ते बाराशे जणांनी मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. त्याची दखल घेऊन संचार बंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमातील तरतूदींचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन मोठमोठ्याने घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरुध्द पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Powered By Sangraha 9.0