परिस

संजय मलमे    07-Aug-2020
Total Views |
मुरलीधर शिंगोटे (बाबा) गेल्याचे वृत्त दुपारी महाराष्ट्रभर पसरले. वृत्तपत्र क्षेत्रातील अनेक मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी फोन करून आपल्या संवेदना व्यक्त केल्या. त्यातील ‘एबीपी माझा’चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी भारताचे ‘रूपर्ट मर्डोक’ गेले, या एका ओळीत त्यांचे केलेले वर्णन निश्चितच समर्पक होते.
 
Paris_1  H x W:
 
रूपर्ट मर्डोक यांनी जगभर वृत्तपत्रांचे जाळे उभारले, हे खरे आहे. पण बाबा त्यांच्यापेक्षा काकणभर सरस होते. रूपर्ट मर्डोक यांना त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी होती. ते माध्यम समूहात कार्यरत होते. शिवाय रुपर्ट उच्च शिक्षित होते. बाबांना कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. शिक्षणही अवघे चौथी, तरीही त्यांनी विविध भाषिक वृत्तपत्रांचे जाळे उभारले आणि यशस्वी करून दाखवले.
अवघ्या २४ वर्षांच्या माझ्यासारख्या तरुणावर संपादकपदाची जबाबदारी सोपवून वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेणे, हे चमत्कारित आणि आश्चर्यकारक होते. मुरलीधर शिंगोटे अर्थात बाबा यांनी ती कमाल करून दाखवली. कारण ते परिस होते. फरक इतकाच की त्यांच्या स्पर्शाने संपादक-पत्रकार घडले. त्यांच्या एकाही दैनिकांचा संपादक ख्याती पावलेला नव्हता. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना त्यांनी संधी देत संपादक बनवत अद्वितीय यश मिळवले.
 
२० वर्षांपूर्वी त्यांना भेटल्याचा दिवस आजही डोळ्यासमोर जशाचा तसा आहे. १९९९ जून महिना होता. बहुधा १५-१६ तारीख असावी. ‘आपला वार्ताहर’ दैनिकाच्या कार्यालयात मी नोकरीसाठी फोन केला. खुद्द संपादक मुरलीधर शिंगोटे यांनीच फोन उचलला. मी माझा परिचय दिला. माझा पूर्वानुभव सांगितला. त्यांनी विनाविलंब कार्यालयात यायला सांगितले.
 
वार्ताहर दैनिकाच्या प्रेसलाईनवरून कार्यालयाचा पत्ता शोधला. दोन-एक तासात घोडपदेवला पोहोचलो. पण कार्यालय माझ्या संकल्पनेला छेद देणारे होते. एका निमुळत्या गल्लीतून तिथे पोहोचलो. मध्यमवर्गीय, मिल कामगारांची वस्ती असलेल्या चाळीतील एका घरात हे कार्यालय होते. पोटमाळ्यावर संपादकीय विभाग होता. मान वाकडी करून वर पोहोचलो. तिथे सहा-आठ जणांचा स्टाफ होता. मी आल्याची एकाने आत वर्दी दिली.
 
मला आत बोलावले जाईल, असे अपेक्षित होते, पण तसे घडले नाही. सफारीतील एक व्यक्ती बाहेर आली. शर्टाची वरची दोन्ही बटणे उघडी... चेहºयावर पांढरी खुरटी दाढी... साधारणत: पासष्टच्या आसपास वय असावे. मी अंदाजाने ओळखले हे मुरलीधर शिंगोटेसाहेबच असणार!
 
मला म्हटले, चला माझ्यासोबत...! मला कार्यालयातून बाहेर आणले. माझ्या खांद्यावर हात टाकला. आम्ही चालत पुढे आलो. एका भेळवाल्याकडे थांबलो. त्यांनी दोन भेळची आॅर्डर दिली. आम्ही भेळ खात कॉटनग्रीन स्टेशनपर्यंत आलो. दरम्यानच्या दहा-बारा मिनिटांच्या काळात मला कामाविषयी-अनुभवाविषयी विचारले. मी सर्व काही सांगितले.
 
नोकरी फिक्स झाली. मला उद्यापासूनच यायला सांगितले. मात्र ड्युटीची वेळ रात्री ११ ते पहाटे ५ होती. तीही कायमस्वरूपी! सुट्टी मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. ‘आपला वार्ताहर’चे संपादक रात्री ११ वाजता गेले की त्यानंतर काही घटना घडल्यास त्यात बदल करण्याची माझ्यावर जबाबदारी दिली गेली. खांद्यावरून हात काढताना ते इतकेच म्हणाले, हे माझे नाही, तुमचे वृत्तपत्र म्हणून काम करा...! जगाच्या इतिहासात अशी अभावानेच एखाद्याची नोकरीसाठी मुलाखत झाली असेल. रस्त्यावर भेळ खात अन् तेही मालक स्टेशनपर्यंत सोडायला...!
मी लोकलने घरी जाण्यास निघालो. दोन-तीन स्टेशन्स गेल्यानंतर मला खिडकी कडेला बसायला जागा मिळाली. मी एकटक नजरेने बाहेर पाहत होतो.
 
मागील अर्ध्या तासातील घटनाक्रम डोळ्यासमोरून सरकत होता. नोकरी स्वीकारावी की नाही, यावरून मनात द्वंद्व सुरू झाले.
वास्तविक मी नुकताच विवाहबंधनात अडकलो होतो, जेमतेम महिना झाला होता. आईच्या आकस्मित जाण्याने आयुष्यात सेटल होण्यापूर्वीच वयाच्या २४ व्या वर्षी कुटुंबाच्या आग्रहास्तव लग्नाचा निर्णय घ्यावा लागला होता. एकीकडे मी नवविवाहित... अन् कायमस्वरूपी रात्रपाळी! तर दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी...! काय करावे हे ठरत नव्हते. अखेर नोकरी हाच पर्याय निश्चित करून लोकलमधून उतरलो.
 
पाच-सहा महिन्यांचा कालावधी गेला. मुरलीधर शिंगोटे तथा बाबांनी सुरू केलेली आपला वार्ताहर, मुंबई चौफेर, यशोभूमि, कर्नाटक मल्ला, तमिळ टाइम्स ही विविध भाषांतील सर्वच दैनिके विक्रीचा नवनवीन उच्चांक गाठत होती. पण ही सर्व दैनिके मुंबईतून प्रकाशित होत होती. त्यांचे मूळ गाव असलेल्या पुणे जिल्ह्यात आपले एकही वृत्तपत्र नाही, याची त्यांच्या मनात सल होती.
१९९९ चा आॅक्टोबर महिना होता. त्यांनी पुण्यातून दैनिक सुरू करण्याचा निर्णय बोलून दाखवला. संपादकाची जबाबदारी पार पडणार का? असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. मी विनाविलंब होकार दिला. ‘पुणे चौफेर’ आणि ‘पुण्य नगरी’ अशी दोन नावे डोळ्यासमोर होती. सरतेशेवटी पुण्य नगरी हे नाव निश्चित झाले. पुणे या नावामुळे दैनिकाच्या विस्तारात मर्यादा येतील म्हणून पुण्य नगरी हे नाव निवडण्यात आले.
 
सुरुवातीला पुण्यात कार्यालय, संपादकीय विभाग नव्हता म्हणून मुंबईतूनच छपाई करून अंक पाठवला जाऊ लागला. पुण्यात वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अवघ्या चार-सहा महिन्यांतच मुंबई आवृत्ती सुरू करण्यात आली. पुढे ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आवृत्त्या काढत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून सुरत, बेळगाव, बिदर या शहरांमधील मराठी वाचकांपर्यंत पुण्य नगरी पोहोचला.
 
मुरलीधर शिंगोटे (बाबा) यांची मेहनत आणि वितरण कौशल्याचा हा चमत्कार होता. आज २० वर्षे झाली, पुण्य नगरीचा संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. मालक असूनही बाबांनी कधीच कामात हस्तक्षेप केला नाही. जे सत्य आहे, ते छापा मी तुमच्या पाठीशी आहे, असे ठामपणे सांगायचे. त्यामुळे आमच्यासाठी बाबा ‘भिऊ नको तुझ्या पाठीशी आहे,’ म्हणणारे स्वामी समर्थ होते.
आज त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला असला तरी ते अदृश्य स्वरूपात निश्चितच आमच्या पाठीशी उभे असतील. आम्हाला विश्वास आणि प्रेरणा देत राहतील. श्रम हीच भक्ती असते, हा त्यांचा मूलमंत्र होता. प्रामाणिकपणे परिश्रम केले की कुठल्याही देवापुढे हात पसरावे लागत नाहीत. देव दगडात नव्हे श्रमात दडलेला असतो, तो तुम्हाला भरभरून देतो, असा बाबांचा विश्वास होता. तो त्यांनी स्वत:ही जपला. वयाच्या ८३ व्या वर्षापर्यंत कार्यरत राहिले.