महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने सतर्क : पालकमंत्री एकनाथ शिंदे

07 Aug 2020 12:28:26
ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने सतर्क व तत्पर राहावे, असे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले.
 
Eknath SHinde_1 &nbs
 
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून शिंदे यांनी या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात एनडीआरएफची पथके तैनात केली असून गरज पडल्यास ठाणे महापालिकेची मदत पथकेही पाठवली जातील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
 
शहरातील सखल भागांमध्ये काही ठिकाणी पाणी साचले आहे, परंतु पंप लावून या पाण्याचा उपसा केला जात आहे. झाडे पडल्याच्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन पडलेली झाडे उचलण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या. महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत असून आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात शिंदे यांनी याप्रसंगी करोनासंदर्भातील परिस्थितीचाही आढावा घेतला.
 
महापालिकेने केलेल्या उपाय योजनांमुळे गेल्या काही दिवसांपासून नव्या बधितांची संख्या घटत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तब्बल ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्णसंख्या दुपटीचा कालावधीही सातत्याने वाढत आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत गाफील राहून चालणार नाही. लॉकडाउन मध्ये बऱ्यापैकी शिथिलता दिली असून परिस्थिती अशीच राहिली तर आणखी काही निर्बंध मागे घेण्यासंदर्भात निश्चितपणे विचार केला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0