शाळा बंद पण शिक्षण सुरू... नवसंजीवन सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम

उमेश मारुती भेरे    06-Aug-2020
Total Views |
शहापूर : राज्यभर कोरणासंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य उद्योगधंद्यासोबत शिक्षण व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं चित्र दिसत आहे. महाराष्ट्र अनलॉकच्या माध्यमातून इतर छोटे मोठे व्यवसाय ,उद्योग धंदे जरी उभारी घेत असले तरीही राज्याचं ग्रामीण भागातील शिक्षण पूर्णतः थांबल्याचं आपण पाहात आहोत. राज्यशिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभर ऑनलाईन शिक्षण प्रणाली जरी सुरू केली असली तरी आजही ग्रामीण भाग,आदिवासी वस्ती वाड्यामध्ये ऑनलाईन म्हणजे काय? याची साधी संकल्पनाही मुलांपर्यंत पोहचली नाही.
 
Student 002_1  
 
अशा वेळेस नवसंजीवन शैक्षणिक व सामाजिक संस्थेने शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकाला शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ, प्रा.नितीन पडवळ, प्रा.संतोष विशे, मुंबई पत्रकार रामनाथ दवणे यांच्या संकल्पनेतून शाळा बंद, पण शिक्षण सुरू असा एक अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत *ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील विविध ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या आदिवासी वाड्या-वस्त्यांवर शिक्षकांच्या विविध टिम या विद्यार्थ्यांना शिक्षण पुरवत आहेत. सोशल डिस्टंसिंगचं काटेकोर पालन करून इयत्ता ५वी ते इयत्ता १०वीपर्यंतच्या मुलांना शिक्षण देणं हा मूळ उद्देश आहे.
 
शहापूर तालुक्यातील विविध भागांमधील शिक्षक व पदवीधर युवक-युवती या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत.शनिवार दि.०१ ऑगस्ट पासून शाळा बंद, पण शिक्षण चालू या उपक्रमाचा शुभारंभ साकडबाव ग्रामपंचायत हद्दीतील बाबरवाडी या आदिवासी वस्तीतून करण्यात आला. संपूर्ण शहापुर तालुक्यासाठी शिक्षकांच्या 14 टीम तयार केलेल्या असून,शाळा सुरू होईपर्यंत,विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.नरेश पडवळ यांनी दिली.ग्रामपंचायतमधील सरपंच,पोलीस पाटील यांच्या सहमतीने व शासनाच्या नियमांचं तंतोतंत पालन करून हा उपक्रम सुरू आहे. शिक्षकांच्या टीमचं नेतृत्व निलेश डोहळे , सोमनाथ रसाळ ,अश्विनी पडवळ ,.वैजयंती दवणे , रुपाली विशे , जयश्री खंडवी , प्रमोद डोहळे, रमेश हरणे यांकडे आहे.