ठाणे जि.प.च्या वर्ग ३ आणि ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशाने बदली प्रक्रिया सुरळीत सुरू

05 Aug 2020 16:04:42
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ आणि वर्ग ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय वार्षिक सर्वसाधारण बदल्या समुपदेशाने करण्यात येत आहेत. शासन नियमानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बदली प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.
 
ZP Thane_1  H x
 
आज ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बाल विकास, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्या गोयंका इंटरनॅशनल स्कुल सभागृहात करण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) छायादेवी शिसोदे, तसेच कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा ) एच. एल. भस्मे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मन पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास ) संतोष भोसले आदि उपस्थित होते.
 
१५ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसार ही बदली प्रक्रिया पार पडत आहे. दिनांक ५ ऑगस्ट २०२० पासून बदली प्रक्रियेला सुरुवात झाली असून दिनांक ७ ऑगस्ट २०२० पर्यंत समुपदेशन पद्धतीने ही बदली प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्भूमीवर सन २०२०-२०२१ च्या या बदल्या कार्यरत पदाच्या १५ टक्के प्रमाणे करण्यात येत आहेत. या बदल्या प्रशासकीय आणि विनंती स्वरूपाच्या आहेत.
 
सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) , वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक आदी संवर्गाच्या समुपदेशनद्वारे प्रशासकीय आणि विनंती बदल्या एकूण १३ करण्यात आल्या. तर महिला व बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षिका संवर्गातील ५ बदल्या करण्यात आल्या. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) संवर्गातील २ बदल्या करण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाच्या सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील एकूण ५ बदल्या करण्यात आल्या. कोव्हिडं १९ च्या संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून ही बदली प्रक्रिया सुरू आहे. बदली प्रक्रियेचे नियोजन सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी- कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत.
Powered By Sangraha 9.0