शेतकऱ्यांची लूट कधी थांबणार?

जनदूत टिम    07-Jul-2020
Total Views |
शेतात पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने निराश झालेल्या शेतकरी बांधवाने कृषी सेवा केंद्रासमोर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. उस्मानाबादमधील नांदुरघाट येथील ही घटना. विशेष म्हणजे सोयाबीनच्या खरेदीसाठी त्यांनी पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवले.
 
farmer_1  H x W
 
कास्तकारी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रसंगी सौभाग्याचं लेणंसुद्धा गहाण ठेवावे लागत असेल, तर यावरून आपल्या देशातील शेतकऱ्यांची काय दैना असेल, याचा अंदाज येतो. या घटनेच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना विचारले असता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याचे आणि फसवणूक करणाऱ्यांकडून शेतकऱ्यांना नुकसानaभरपाई मिळवून देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ही फसवणूक करणारी लॉबी इतकी निढावलेली आहे की, अशा कुठल्याच कारवाईला ती घाबरत नाही.
 
यंदाच्या हंगामात विदर्भासह अन्य भागात बोगस बियाणांचा मुद्दा ऐरणीवर आहे. हजारो हेक्टरवरील सोयाबीन उगवलेच नाही. बोगस बियाणे आणि खताच्या विक्रीचे फार मोठे रॅकट सक्रिय आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने या माध्यमातून कृषी सेवा केंद्र चालक, व्यापारी, कृषी विभागातील अधिकारी आपले उखळपांढरे करून घेत असतात. मात्र, हे सगळे करताना आपण जगाच्या पोशिंद्याला फसवत असल्याचा कुठलाही भाव त्यांच्या चेहऱ्यावर नसतो. विशेष म्हणजे यामधील अनेकांना शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेली असते. असे असतानाही आपल्याच बांधवांची फसवणूक करताना त्यांना काहीच वाटत नाही.
 
काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यात १६ लाख किमतीचे बोगस बियाणे जप्त केले होते. गडचिरोली जिल्ह्यातील बोगस खताच्या कारखान्याचीही माहिती उघड झाली. आंध्र प्रदेश, " तेलंगणामधून अशा बोगस - बियाणांची व खताची सर्रास आवक होत असते. मान्यता नसलेल्या कपाशी बियाणांची 'चोर बीटी' म्हणून विदर्भात मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यामध्ये सुजाण शेतकरीही अधिक उत्पन्नाच्या आमिषाने असे बियाणे खरेदी करत असतो. सगळा व्यवहार 'चोरी-चोरी, चुपके-चुपके,' बियाणे उगवले नाही तर कोणाकडे तक्रार पण करता येत नाही. 'तेरी भी चूप, मेरी भी चूप.' अधिकृतपणे बियाणे विकत घेतले आणि ते उगवले नाही तर निदान तक्रार तरी करता येते. मात्र, अशा तक्रारींची किती दखल घेतली जाते, हे न विचारलेलंच बरं, असं तसं करून एखाद्या बियाणे निर्मिती कंपनीवर किंवा कृषी सेवा केंद्र चालकावर चौकशी बसलीच तर चौकशी अधिकाऱ्यांना पाकीट देऊन मॅनेज कसे करायचे, ही कला पण त्यांना अवगत आहे. येथे फसवला आणि नागवला जातो, तो फक्त शेतकरीच, बियाणे व खते उत्पादक कंपन्या विक्रेत्यांना मोठमोठे पॅकेज देत असतात.
 
अधिक मार्जिन असलेल्या बियाणांच्या पिशव्या शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात असतात. आग्रह करूनही हवा तो ब्रैड शेतकऱ्यांना मिळत नाही. रोखीने व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांना पाहिजे तो बँड मिळतोही. मात्र, रोखीने शेती करणारे शेतकरी हे असतात तरी किती. बहुतांश शेतकरी हे बँका आणि सावकारांकडून कर्ज घेऊन, उधार-उसनवारी करून, प्रसंगी पत्नीच्या अंगावरील दागिने गहाण ठेवूनच शेती करतात एवढं सारं करूनही बोगस बियाणे त्यांच्या मात्र, त्याच वेळेस भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळते.
 
एक शाल, श्रीफळ आणि पन्नास रुपयांचे प्रमाणपत्र, किती ही थट्टा ! अशाच एका बियाणे निर्मिती कंपनीच्या मार्गदर्शक शिबिराला जाण्याचा योग आला. मार्गदर्शनानंतर शेतकऱ्यांसाठी मसाला भाताची मेजवानी ठेवली होती. तो घेण्यासाठी रांगेत उभे असताना, कृषी सेवा केंद्राचा मालक असलेल्या माझ्या मित्राने मला हात धरून बाहेर काढले आणि म्हणाला, आपल्यासाठी वेगळी तयारी आहे. मंडपाच्या मागच्या बाजूला विक्रेते, व्यापारी, कृषी विभागातील अधिकारी हे पंचपक्वान्नावर (मटन, चिकन, मदिरा) ताव मारत असल्याचे चित्र होते. ज्यांच्या जीवावर तुमचे संसार उभे राहते, त्याच अन्नदात्यांची सर्वात मोठी चेष्टा! बोगस बियाणांसोबतच शेतकऱ्यांची दुसरी फसवणूक होते ती कीटकनाशकांच्या माध्यमातून, प्रभावहीन कीटकनाशके अव्वाच्या सव्वा भावात शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. उधारित घेणाऱ्या शेतकऱ्यांची तर प्रचंड लूट केली जाते. व्याजाव 1 व्याजलावून त्याची वसुली म्हणून - कापसाची पहिली गाडी कृषी सेवा केंद्राच्या नावावर केली जाते. कारण व्यवहारच तसा झाला असतो.
 
कापूस निघाल्यावर उधारी द्यायची. ही लूट इथेच थांबत नाही. उरली-सुरली कसर दलाल व व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात कृषी मालाची खरेदी करून भरून काढतात. पुन्हा राहिलंच काही तर अवैध सावकार आहेतच. भाबड्या शेतकऱ्यांना न समजणाऱ्या व्याजाच्या गणितात गुंतवून कर्ज द्यायचे, असे कर्ज जे कधी फेडताच येणार नाही. शेवटी तारण म्हणून ठेवलेल्या शेतावर डल्ला मारायचा. अशा किती तरी शेतजमिनी सावकारांच्या घशात गेल्या आहेत. इंचभरही जमीन नसणारे अनेक लुटारू सावकार आज शेतमालक होऊन बसले आहेत आणि कित्येक पिढ्यांपासून शेतमालक असलेला शेतकरी आज भूमिहीन झाला आहे. हे वास्तव आहे. मागच्याच आठवड्यात विदर्भात एका अवैध सावकारांनी भाडोत्री गुंडांच्या मदतीने शेतकरी महिलेला विवस्त्र करून मारहाण केली आणि शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. काही वर्षांपूर्वी स्वर्गीय आर.आर. पाटील यांनी अशा सावकारांना कोपरापासून सोलून काढण्याचा दम दिला होता. मात्र, ही गेंड्याची कातडी आहे, ती सहजासहजी सोलली जाईल, असे वाटत नाही. यासाठी काही तरी वेगळी ट्रीटमेंट शोधण्याची गरज आहे.