सरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत महाराष्ट्राची ंदिशाभूल करत आहेत! -चन्द्रकांत दादा पाटील

जनदूत टिम    05-Jul-2020
Total Views |
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सामना मधून भाजपा ऑक्टोबर पर्यंत सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल असा आरोप केला आहे. मुळात राऊत तुम्हाला तिन्ही पक्षांच्या अंतर्गत चाललेल्या भांडणावरून सरकार पडण्याची भीती वाटत आहे असे संपूर्ण महाराष्ट्राला समजते.ती भीती तुम्ही भाजपाच्या नावाने बोलून दाखवत आहात.

chandrakant-dada-patil_1& 
 
कोरोनासारख्या गंभीर परिस्थिती मध्ये आज महाराष्ट्र अडकला आहे त्यापेक्षा तुम्हाला भाजपा वर खोटे आरोप करणे महत्वाचे वाटते का ? सरकार पडण्याचा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो का ? दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोना त्याचे पाश आणखी घट्ट आवळत चालला आहे, कोरोनामध्ये होणारा मृत्युदर वाढतोय. राज्य सरकारचा प्रत्येक प्रयत्न हा गेल्या तीन महिन्यांपासून दिशाहीन असल्याचे संपूर्ण देशाला माहित आहे.तुमच्या सरकारी कार्यकाळात आपले पोलीस , डॉक्टर , परिचारिका,सफाई कर्मचारी देखील असुरक्षित आहेत .शेतकऱ्यांची बियाणं आणि पुढच्या हंगामातील कर्जाची समस्या तर तुम्हाला सोडवावीशी देखील वाटत नाही. या सर्व चुकांचे आत्मपरीक्षण करून त्या सुधारायच्या सोडून तुम्ही भाजपावर निष्फळ आरोप करत आहात.
 
कित्येक वर्षांपासून तुमच्या हातात मुंबई महानगरपालिका आहे परंतु दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई पहिल्या पावसात तुंबली आहे.पूर्ण शहर गेले तीन महिने रिकामे होते, योग्य नियोजन करून पावसाळ्याच्या आधी सर्व कामे तुम्ही करू शकला असता पण तसे तुम्ही केले नाही परिणामी मुंबई पुन्हा तुंबली आणि कोरोनाच्या संकटात आता नागरिकांच्या संकटात आणखी वाढ झाली आहे.
या सर्वांबद्दल सामना नेहमीच गप्प असतो .फक्त केंद्र सरकारच्या चीन विरुद्धच्या कारवाईं वर मनाला येईल तशी टीका करणं आणि भाजपा हे सरकार पाडू बघत आहे अशी विधान करणं एवढंच वाचायला मिळतं. मी मांडलेल्या सगळ्या समस्यांच्या उपाययोजनांवर कधी बोलणार राऊत? सत्तेच्या मोहात तुम्हाला जनतेचे प्रश्न दिसत नाही. तुम्ही राज्य शासनाचे अपयश हे भाजपा वर आरोप करून लपवू शकत नाही. जनता सुजाण आहे . शेवटी तीच ठरवेल भविष्य.
- भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील