धनंजय महाडिक यांची भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी निवड

जनदूत टिम    05-Jul-2020
Total Views |

- दैनिक 'जनतेचा जनदुत'च्या बातमीचा इम्पॅक्ट

सोलापूूर : माजी खासदार धनंजय महाडिक यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने व केंद्र सरकार यांच्या दरम्यान समन्वयक [कोऑर्डिनेटर] म्हणून धनंजय महाडिक यांनी काम करावे अशा विशेष महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदाचे नियुक्तीचे पत्र त्यांना आ. चंद्रकांत पाटील यांनी प्रदान केले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
 
Dhananajay Mhadik_1 
 
धनंजय महाडिक गेली १० वर्ष झाली भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. सदर कारखान्याची सूत्रे हातात घेतल्यापासून त्यानी काळाची गरज ओळखून विस्तारीकरण तसेच वीजनिर्मिती प्रकल्पाचे मोठे काम हाती घेतले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु साखर उद्योगापुढील अडचणींमध्ये वरचेवर वाढच होत गेली. दर एक वर्षानंतर पडणारा दुष्काळ, अपूर्ण गळीत हंगाम, ऊसतोडणी कामगारांचा तुटवडा तसेच तोडणी कामगार व मुकादम यांचे कडून कारखान्यांची होणारी आर्थिक फसवणूक वाहतूक कॉन्ट्रॅक्टर-ट्रॅक्टर मालकांची एकाचवेळी अनेक कारखान्याबरोबर करार केला.
 
पैशाची उचल करून कारखाना प्रशासनाची केली जाणारी फसवणुकीची प्रवृत्ती, साखर विक्रीवरील निर्बंध, साखरेचे कोसळणारे बाजारभाव, साखर उत्पादन खर्च व विक्री किंमत यामधील तफावत, साखर निर्यातीसाठीचे प्रोत्साहनपर अनुदान सरकारकडून थकल्यामुळे आलेला अतिरिक्त व्याजाचा ताण, तसेच थकित कर्जांवरील व्याजाचा अतिरिक्त ताण, सरकारी पातळीवरील अर्थसहाय्य चा अभाव तसेच त्यामधील संचालकांचा स्वतःच्या मालमत्तेचा तारण देण्याविषयीची जाचक अट,चुकीचे आयात-निर्यात धोरण, साखर धोरणाबाबत केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये योग्य समन्वयाचा अभाव, या व इतर आणि समस्यांमुळे संपूर्ण भारत देशातील साखर उद्योग प्रचंड धोक्यात आला आहे.
 
महाडिक सातत्याने या विषयी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आले आहेत. स्वतः उद्योगपती म्हणून तसेच त्यांचा साखर कारखानदारीचा अनुभव लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने साखर कारखान्यांपुढिल समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत काम करण्याची विशेष जबाबदारी त्यांच्यावर सोपविली असून सदर जबाबदारी म्हणजे संपूर्ण साखर उद्योगाला अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी मला दिली गेलेली एक सुवर्णसंधी असून मी संधीचे सोने करून दाखवेन असे उदगार मा.खा. धनंजय महाडिक यांनी यावेळी त्यांनी काढले.
 
माजी खा. धनंजय महाडिक यांची नेमणूक म्हणजे दैनिक ' जनतेचा जनदुत ' च्या बातमी चा इम्पॅक्ट
चारच दिवसापूर्वी आमच्या दैनिक जनदूत मध्ये संपूर्ण देशात साखर उद्योग ऑक्सिजनवर सरकारी मदतीची गरज अन्यथा शेतकरी उध्वस्त ' या प्रा. संग्राम चव्हाण, जिल्हाध्यक्ष ,सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस यांच्या त्यावरील विविध उपाययोजनांच्या बाबत केलेल्या मागणीची बातमी प्रसिद्ध केली होती. सदर मागणी संपूर्ण राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार ,तसेच सर्वच साखर कारखानदारांनी उचलून धरली होती. वरील बातमीची त्वरित दखल घेऊन भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रसरकार पातळीवर उपाय योजनांचे पाऊल म्हणून माजी खासदार मुन्ना साहेब उर्फ धनंजय महाडिक यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली आहे.

धनंजय महाडिक यांचे कडून संपूर्ण महाराष्ट्रातील साखर उद्योगाला मोठ्या अपेक्षा
प्रा. संग्राम चव्हाण जिल्हाध्यक्ष ,सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस
सध्या केंद्रामध्ये भा.ज.पा. सरकार असुन या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचा त्याग करून नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले,तरुण व अभ्यासू माजी खासदार श्री.धनंजय महाडिक यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रातील साखर उद्योगाला तसेच अडचणीत सापडलेल्या सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना,कामगार व ऊसवाहतूकदरांना मोठ्या अपेक्षा असून त्यांच्या या केंद्र सरकार व महाराष्ट्रातील साखर कारखाने यादरम्यान च्या समन्वयक म्हणून नियुक्ती ला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. श्री. महाडिक यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याला, कामगाराला डोळ्यापुढे ठेवून सर्वच साखर कारखान्यांसाठी नि:ष्पक्षपातीपण केंद्र पातळीवर नियोजनबद्धपणे प्रयत्न करून साखर उद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी जीवाचे रान करावे अशी प्रतिक्रिया प्रा. संग्राम चव्हाण यांनी टाकळी सिकंदर येथे या वेळी दिली.