वाढदिवशी शुभेच्छा द्यायला गर्दी करु नका, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

जनदूत टिम    24-Jul-2020
Total Views |
सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यही करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहे. राज्यात नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारला सुरुवातीच्या काळातच या खडतर आव्हानाचा सामना करावा लागत आहे.
 
Udhhav_1  H x W
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आरोग्य यंत्रणेने गेल्या काही दिवसांपासून आश्वासक कामगिरी केली आहे. काही ठिकाणी विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यात राज्य सरकारला यश आलं असलं तरीही काही ठिकाणी परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे.
 
२७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मात्र यंदा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. कार्यकर्त्यांना आवाहन करताना, शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानावर गर्दी करु नका असं आवाहन उद्धव यांनी केलं आहे. तसेच आपल्या वाढदिवशी आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान, प्लाझ्मा दान शिबीरांचं आयोजन करावं. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ देणगी द्यावी असंही ठाकरे म्हणाले आहेत.
 
आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. २७ जुलैस आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. गेल्या चार महिन्यांपासून राज्य सरकार नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.