गरोदर हत्तीणीची हत्या आणि संवेदनशीलतेचा अमानविय ट्रेंड

उमेश मारुती भेरे    09-Jun-2020
Total Views |
परवा केरळ मध्ये जी अमानविय घटना घडली त्याचे पडसाद सध्या संपूर्ण भारतात उमटत आहेत . एका गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला घातला गेला आणि त्याचा स्फोट होऊन त्या हत्तीणीचा आणि तिच्या पोटातल्या पिल्लाचा जीव गेला .मानवतेच्या खोट्या मुखवट्याला काळे फासनाऱ्या या घटनेचा देशभर विविध स्तरावर निषेध व्यक्त केला गेला.
 
abortion-_1  H
 
यावरून देशात संवेदना असलेली माणसं ही शिल्लक आहेत याची प्रचिती झाली .याच प्रचितीतून एक मुद्दा अधोरेकीत करण्याची गरज वाटते .ज्या प्रमाणे त्या गर्भवती हत्तीणीचा आणि गर्भातल्या पिल्लाचा बळी गेला त्याच प्रमाणे जगभर रोज कितीतरी हजार बालके गर्भातच मारली जातात .फक्त आपल्या देशाचाच विचार केला तर अंदाजे दीड कोटीच्या वर बालके गर्भात मारली जातात .कारणे काहीही असो पण या ही निष्पाप जिवांच्या हत्याच आहेत .पण त्यावेळी आपल्या संवेदनांना आपल्या निष्ठूर मनाने आवर घातलेला असतो .
 
ज्या प्रकारे आपण या हत्तीणीच्या आणि तिच्या पिल्लाच्या हत्येवर निषेध नोंदवला, सोशल मीडियावर ट्रेंड चालवला तसाच ट्रेंड रोज मानवी बालकांच्या होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी चालवला तर मानवता जिवंत ठेवता येईल .भावनांचा काहीही संबंध नसताना फक्त ट्रेंड म्हणून सोशल मीडियावर व्यक्त होणं म्हणजे संवेदनशील असणे असे भासवणे हा गैरसमज आणि खोटेपणा आहे .देशात अंदाजे दरवर्षी होणाऱ्या दीड कोटी गर्भपातापैकी 73% महिला स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्याने गर्भपात करतात , 22%महिला रुग्णालयात सर्जिकल प्रक्रिया करून गर्भपात करतात तर 5% महिला असुरक्षित पद्धत वापरून गर्भपात करतात .या पाच टक्क्यात बाळासह अनेकवेळा आईचा ही म्रूत्यू होत असतो .
 
या पैकी अनेक गर्भपात हे गरज म्हणून केले जातात .वैद्यकीय गर्भपात कायदा म्हणजे MTP नुसार स्त्री ला गर्भपाताचा अधिकार देण्यात आला आहे आणि यात वेळोवेळी सुधारणा ही करण्यात आली आहे .त्यामुळे कायद्याच्या प्रक्रीयेतुन जाऊन काही माताना गर्भ नाकारण्याचा अधिकार आहे .नको असलेली गर्भधारणा , बलात्कारातून झालेली गर्भधारणा , गरोदर मातेला असलेले गंभीर आजार किंवा अन्या काही कारणांमुळे गर्भपात केले जातात .पण इतका मोठा आकडा फक्त अडचण म्हणून गर्भपात करण्यासाठी अधिक्रुत वाटतो का ? याशिवाय बेकायदेशीर लिंग निदान चाचणी करून गर्भपात केलेल्या प्रकरणांचा आकडा आज ही मोठा आहे .माताम्रूत्यू पैकी 8% म्रूत्यू हे फक्त असुरक्षित गर्भपात केल्याने होत आहेत .ही बाब चिंतेची आहेच शिवाय असुरक्षित गर्भपात करण्यास प्रवूत्त करणारे कुटुंबीय या म्रूत्यूला जास्त जबाबदार आहेत यावर लक्ष देण्याची गरज आहे .गर्भपाताचे कायदे कडक आणि किचकट असल्याने शॉर्टकट वापरून दोन्ही जिवांची हत्या होत असल्याने परवाच्या हत्तीणीचा आणि तिच्या पोटातील पिल्लाच्या हत्येचा परस्पर समतोल साधल्यास अशा रोज घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होण्यास आपण का धजावत नाही हा प्रश्न पडतो . जर अनाधिकृत पद्धतीने गर्भपाताचा प्रयत्न झाला आणि त्यात बाळासह मातेचा ही बळी गेला तर या हत्येला जबाबदार असलेली पूर्ण साखळी जेलमध्ये गेली पाहिजे .गर्भपात करण्यास प्रव्रूत्त करणारे कुटुंबीय , नवरा , गर्भलिंग निदान करणारे सेंटर , डॉक्टर्स आणि दलाल ही सगळी आज ही गल्लोगल्ली कार्यरत आहेत .
 
शासनाने बेकायदेशीर लिंग निदान चाचणीवर बंदी आणली असून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कडक कायदे बनवले आहेत .तरीही चोरून बेकायदेशीर लिंग निदान चाचणी करणारे आणि मुंडे दांपत्याच्या औलादीचे अनेक डॉक्टर आज ही स्त्रीभ्रूण हत्या करीत आहेत .अनेक वेळा गटारात , एखाद्या डबक्यात किंवा खड्ड्यात पूरलेले स्त्री अर्भक मिळाल्याच्या बातम्या आपण वाचत असतो .या बातम्या वाचतांना आपली सोशल मीडियावर भरकटलेली मनं कधीच विचलित होत नाहीत कारण त्यावेळी एखादा ट्रेंड प्रचलित झालेला नसतो .दिल्लीत निर्भया बलात्कारावर मेणबत्ती पेटवणारा विशेष वर्ग देशभर निदर्शने करतो पण हेच बलात्कार रोज होतात त्यावर कधीच बोलत नाही .मुलगी नको म्हणून गल्लोगल्ली क्लिनिक टाकून स्त्रीभ्रूण हत्या होतात पण त्यावर आपण बोलत नाही .हे प्रकार निदर्शनास येत असले तरी त्यावर ब्र शब्द काढायला आपल्यातला संवेदनशील माणूस पुढे येत नाही .एका हत्तीणीसाठी परवा पासून पूर्ण देश रडला आणि रडलाच पाहिजे कारण देशात माणसासह प्राण्यांना सुद्धा रोज संपवले जाईल अशी आसुरी शक्ती व्रूद्धिगत होत आहे . पण रोज असे मानवी देह पोटात संपवून त्यांची हत्या होते तेव्हा आपण काहीच का व्यक्त होत नाहीत .या हत्या करणाऱ्यांमध्ये तुमच्या आमच्यातील अनेक जण असू जे परवा पासून सोशल मीडिया वर अश्रू गाळत आहोत मुलगी नको म्हणून आपल्यातील हजारो पुरुषांनी बळजबरीने गर्भपात करायला भाग पाडले असेल.
 
वीस आठवड्यानंतर गर्भापात करण्यास भारतात कायदेशीर बंदी आहे .गेली अनेक वर्ष न्यायालयात मागणी होते आहे कि ही मर्यादा चोवीस आठवडे करण्यात यावी .न्यायालय ही यावर विचाराधीन आहे .पण मुख्य मुद्दा असा आहे कि गर्भातील बाळ अपंग आहे हे कळल्यावर गर्भपात करण्यासाठी लोकं न्यायालयात परवानगीसाठी जात असतात पण याच काळात बाळाचे लिंग निदान ही होत असते .त्यामुळे इतर कोणतेही कारण करून अनधिक्रुत क्रूत्य कायद्याच्या चौकटीत राहून केले जाण्याची शक्यता आहे . समाजात जर काही सकारात्मक शक्ती नसत्या तर आज माणूस माणसाला कच्चे खाऊ शकला असता अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे .त्या उंबरठ्यावर आज माणूस पोहोचला सुद्धा आहे .परवा हत्तीणीची आणि गर्भातल्या पील्लाची झालेली हत्या समोर येताच आणखी एका ठिकाणी मोटार सायकल स्वार चालू गाडीवरून कुत्रं खेचन नेताना माणुसकी संपलेली दाखवली गेली .नंतर एका बिबट्याला लोकांनी मारहाण करून मारून टाकला आणि पुन्हा माणुसकी हेलावली .
 
या आठवड्यात अशा माणुसकीला कालीमा फासनाऱ्या घटना घडल्या हे आपल्याला दिसलं कारण आपण एखादा विषय ट्रेंड म्हणून चघळत असतो .पण अशी माणुसकी रोजच असूराला लाजवेल अशा थराला जात असते .त्यामुळे या देखाव्याच्या संवेदना रोजच जिवंत ठेऊन निसर्गातील सर्व घटकांचे संवर्धन करायची गरज आहे .रोज होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्या जरी शंभर टक्के रोखण्यासाठी सतर्कता दाखवली तरी निसर्ग वाचवता येईल कारण स्त्री ही निसर्गाची जननी आहे . तिला फक्त शोभेची वस्तू म्हणून वागवू नये तर तिचा सन्मान आणि अधिकार कायम ठेवणे गरजेचे आहे .