टाळेबंदी मुळे जव्हार मधील वारली चित्रकार आर्थिक अडचणीत

पारस सहाणे    30-Jun-2020
Total Views |

- तर काही चित्रकरांनी शोधला व्यवसायात पर्यायी मार्ग

जव्हार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांना खीळ बसू लागली आहे. याचा सर्वात जास्त परिणाम ग्रामीण भागात जाणवू लागला आहे. पालघरमधील आदिवासी भागात वारली पेंटिंग करणारे पेंटर ही याला अपवाद ठरले नाहीत.
 
Bhagwan Kadu_1  
 
वारली चित्रकला ही खूप जुनी कला असून पूर्ण जगात तिला ओळख आहे ,वारली चित्रकलेचा उगम हा पालघर जिल्ह्यातील असून पालघर जिल्ह्यातील विविध गावातील कलाकार पेंटिंग करतात , आदिवासी समाजातील लग्न असल्यास वारली चित्र घरात काढली जातात. वारली पेंटिंगला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असून मुंबई ,ठाणे नाशिक, पुणे या शहरांमधील नागरिक जव्हारमध्ये पेंटिंग घेण्यासाठी येत असतात मात्र कोरोना मुळे, बाजारपेठ बंद असल्याने सदर पेंटींगची विक्री कमी झाली असून वारली चित्रकार आर्थिक विवंचनेत आहेत.
 
वारली पेंटींग सोबत वारली हस्तकलेच्यावस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात, बांबूपासून तसेच अन्य लाकडापासून बनवलेल्या ग्रामीण कलाकुसरीच्या वस्तुंना मोठी मागणी असते. जव्हार तालुक्यातील रामखिंड येथील भगवान कडू हे कलाकार हाताने मुखवटे तसेच वाद्य असलेला तारपा तयार करतात गेले 3 महिने त्यांच्या कलावस्तूंनाही मागणी नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे असे ते सांगतात. जव्हार शहरातील मांगेलवाडयात वारली चित्रकलेचे कलादालनाचे चित्रकार पांडुरंग चौधरी यांच्या पेंटिंगना बाजारपेठेत मोठी मागणी असते,त्यांच्या पेंटिंग घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे,नाशिक येथील नागरिक फोनवरून ओर्डर देत असतात किंवा प्रत्यक्ष दुकानातून खरेदी करतात.
 
पालघरची वारली चित्रकला सातासमुद्रापार गेली असताना मात्र कोरोना कलाकारांच्या हातांना रोजगार नाही शासनाने त्यांच्या या समस्येकडे लक्ष देऊन त्यांना योग्य ते सहकार्य करून महिन्याला आर्थिक मदत केली पाहिजे असे चित्रकला कलाकार मागणी
करत आहेत. तसेच डहाणू भागातील वारली चित्रकारांनी व्यवसायात नवीन पर्याय शोधला असून वारली पेंटिंग करणाऱ्या ४५० तरुणांनी आदिवासी युवा सेवा संघाच्या माध्यमातून एकत्र येत पावसाळ्यात लागणाऱ्या छत्र्यांवर वारली पेंटिंग करुन त्यातून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्धार केला आहे.बाजारपेठेतून छत्र्या विकत घेऊन हे तरुण या छत्रीवर वारली पेंटिंग करुन विक्री करतात. या छत्र्यांची किमंत २०० ते ५०० रुपयांच्या घरात आहे.
 
Warli-Painting-Umbrella-1
 
आदिवासी हस्त कलेला मोठी मागणी असली तरी सध्या ही हस्तकला जिवंत ठेवण्यासाठी या आदिवासी युवा सेवा संघाने पुढाकार घेतला असून या तरुणांच्या हाताला रोजगार दिला आहे. शाळेतील विद्यार्थी ते तरुण हे सगळे यात समाविष्ट असून एका छत्रीसाठी यांना ८० ते २५० रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते. यातून या आदिवासी कलाकारांना रोजगार तर मिळतोच शिवाय आदिवासी पेंटिंग ही जिवंत राहण्यास मदत होते. देशातील आणि राज्यातील नागरिकांनी या छत्र्याखरेदी केल्या तर या गरजूंना रोजगार उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. परदेशात आदिवासी हस्तकलेला मोठी मागणी असली तरी सध्या आयात निर्यात बंद असल्याने या आदिवासी पेंटिंग करणाऱ्या कारागिरांना रोजगाराची गंभीर समस्या भेडसावत होती. यावर आदिवासी युवा सेवा संघाने शोधलेला हा पर्याय नक्कीच वाखाणण्याजोगं आहे.
 
वारली चित्रकारांना आर्थिक सहाय्य देणे गरजेचे आहे मात्र शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असून वारली चित्रकारांसाठी विविध योजना व आर्थिक सहाय्य योजना उपलब्ध आहेत मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत ही शोकांतिका आहे जव्हारमधील एका संस्थेने चित्रकारांच्या नावावर निधी उपलब्ध केला होता मात्र तो पैसा कुठे खर्च झाला याची चर्चा आजही सुरू आहे
करोनामुळे जीवनशैली बदलते आहे, त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंवर कलाकृतींची झलक आणून नवीन वास्तुनिर्मितीसाठी प्रयत्न केल्यास या माध्यमातून या कलाकरांना चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील, सोबत शेती, वनोपज, वनौषधी, वन भाजी इत्यादी पूरक उपक्रम यांची मोलाची भूमिका ठरेल. संस्कृतीचे मूल्य टिकवून नवीन स्वरूपात वस्तू निर्मिती च्या दृष्टीने आवश्यक अभ्यास आणि प्रयोग आयुश टीम तर्फे करतो आहोत. यात जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे, आवश्यकतेनुसार व्यापक स्वरूप देण्यात येईल. सध्या वारली चित्र असलेल्या डिझायनर छत्री, मास्क, टी शर्ट, साडी, पिशवी, ओढणी, किचेन, इत्यादी बनवल्या आहेत.
- सचिन सातवी,
अध्यक्ष, आदिवासी युवा सेवा संघ (आयुश टिम)
 
वारली पेंटिंग विक्री मधून महिनाकाठी वीस ते पंचवीस हजार रुपये उत्पन्न मिळत होते मात्र कोरोनामुळे हाताचा रोजगार गेला आहे, त्यामुळे आर्थिक गणित बिघडली आहेत
- पांडुरंग चौधरी,
वारली चित्रकार, जव्हार