खासगी कंपन्यांसाठी मोकेळे आकाश!

जनदूत टिम    30-Jun-2020
Total Views |
अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील आघाडीच्या देशांमध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये आहे. भारताने आतापर्यंत केलेली कामगिरी जगाचे डोळे दिपवणारे आहे. मंगळावरची स्वारी असो की चंद्रावरील स्वारी असो, भारताने दिमाखात पावले टाकली आहेत.
 
Clear-Sky_1  H
 
गेल्यावर्षी २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ अपयशी ठरले असले तरी चंद्रापर्यंत सहजतेने पोहोचण्यात यश मिळवले होते. विक्रम लँडर व्यवस्थित चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकले नाही. त्यामुळे त्यातील प्रज्ञान बग्गी बाहेर पडू शकली नाही आणि त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचा नीट अभ्यास करता येऊ शकला नाही. मात्र भारत हरलेला नाही, नव्या दमाने पुन्हा कामाला लागले आहे. दुसरीकडे भारतातील व विदेशांतील अनेकांसाठी प्रक्षेपणाचे बरेच कार्यक्रम पूर्ण करून आपली अंतराळ क्षमता दाखवून दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधनात थांबणार नाही, त्यासाठीच भारताने आता खाजगी कंपन्यांनाही सहभागी करून घेण्याचा विचार केला आहे. खासगी कंपन्यांना अंतराळ क्षेत्रात दिली गेलेली परवानगी भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण रशिया, अमेरिकेसह अनेक देश अशा खाजगी कंपन्यांच्या मदतीने अनेक मोहिमा आखत आहेत आणि यशस्वीही करीत आहेत. त्यामुळे भारतातही यापुढे अशाच प्रकारे खाजगी कंपन्यांच्या मार्फत आणि सहयोगाने अनेक मोहिमा आखून त्या यशस्वी करता येऊ शकतील. सरकारच्या या निर्णयामुळे खासगी क्षेत्रालाही अंतराळात रॉकेट, उपग्रह निर्माण आणि प्रक्षेपण सेवा देण्यासाठी परवानगी मिळणार आहे.
 
शिवाय खाजगी उद्योगांना अवकाश क्षेत्र उघडल्यामुळे अवकाश तंत्रज्ञानाचे फायदे वाढवण्यास तसेच भारतीय उद्योगांना जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी सक्षम करू शकेल. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनीही केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. जेव्हा खाजगी कंपन्या यात सहभागी होऊ लागतील तेव्हा स्पर्धात्मक वातावरणात चढाओढ निर्माण होईल आणि अव्वल कामगिरी करण्यासाठी प्रयत्न होतील. सरकार खाजगी कंपन्यांना सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांना संशोधनास परवानगी देण्यासाठी एक 'भारतीय राष्ट्रीय अंतराळ, संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र' नावाची स्वायत्त संस्था स्थापन करणार आहे. खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ती कार्यरत राहील.खाजगी कंपन्यांना अंतराळ अभ्यास काही नवा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक खाजगी कंपन्या इस्रोला आवश्यक त्या वस्तुंचा पुरवठा करीत आल्या आहेत. मात्र आता त्या प्रत्यक्ष मोहिमांत सहभागी होऊ शकणार आहेत किंवा संशोधन करू शकणार आहेत. त्यामुळे अर्थातच अंतराळ संशोधनाच्या कक्षा रुंदावणार आहेत. अमेरिका, रशिया, चीन तसेच युरोपातील अनेक देश यापूर्वीपासूनच खाजगी कंपन्यांना आपल्या मोहिमांत सहभागी करून घेत आले आहे. त्यामुळे अर्थकारणाच्याही कक्षा रूंदावू लागल्या आहेत. खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून इस्रोच्या पायाभूत सुविधांचाही एका मर्यादेपर्यंत वापर करू दिला जाणार आहे.
 
आज जगात सर्वच क्षेत्रात तीक्ष्ण अशी स्पर्धा आहे तशी ती अंतराळ संशोधनातही आहे. भारताने अमेरिकेसह अनेक बलाढ्य देशांच्या शेकडो उपग्रहांचे यशस्वी उड्डाण यापूर्वी केलेच आहे. जागतिक स्तरावर जर भारताच्या अंतराळ विश्वाची व्याप्ती वाढवायची असेल तर खाजगी कंपन्यांना सहभागी करून घेणे सोयस्कर ठरू शकेल. शिवाय जागतिक स्पर्धेत टिकाव धरायचा असेल तर संशोधनाची व्याप्ती वाढलीच पाहिजे. शिवाय इस्रोवर पडत असलेला ताण थोडासा त्यामुळे सैल होणार आहे आणि नव्या संशोधनाला मुक्त अवधी मिळणार आहे. अमेरिकेतील 'नासा'नेही अनेक खाजगी कंपन्यांच्या मदतीने अनेक मोहिमा हाती घेतल्या आणि यशस्वीही केल्या. २००३ मध्ये कोलंबिया शटल पृथ्वीच्या दिशेने येत असताना अपघात झाला आणि त्यानंतर नासाने असे अवकाश यान तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले की जे चंद्रावर जाऊ शकेल, त्यामुळे क्रू आणि कार्गोच्या कामासाठी खाजगी कंपन्यांचा सहभाग करून घेण्यास सुरुवात केली. २०१४ मध्ये स्पेसएक्स नावाची एलन मस्क यांच्या कंपनीला नासाशी करार करता आला. या स्पेसएक्स कंपनीने फाल्कन ९ रॉकेटचे उड्डाण केले आहे. स्पेसएक्स जगातील एकमेव अशी कंपनी आहे जी नियमितपणे रॉकेट यशस्वीरित्या परत पृथ्वीवर आणू शकते, त्यामुळे पुन्हा त्यांचे उड्डाण करू शकतो. जी कंपनी आतापर्यंत केवळ मालवाहतूक करीत होती. ती आता अंतराळवीरही पाठवू लागली आहे. याच मस्क यांची स्टारशिप नावाची कंपनी मोठी स्पेसक्राफ्ट विकसित करीत असून मंगळावर माणसांची वस्ती तयार करण्यासाठी उपयोगी आणले जाणार आहे !
 
 
आज नवनवीन तंत्रज्ञान अवगत होत आहे. अंतराळातही स्पर्धा सुरू झाली आहे. जगातील सुमारे ७२ देशांत स्पेश एजन्सी आहेत. यात प्रामुख्याने भारत, चीन, जपान या देशातील एजन्सी मोठ्या प्रमाणावर काम करतात, रशियन रोस्कोस्मॉस नावाची एजन्सी सध्या अवकाशात अंतराळवीर पाठवत आहे. अमेरिकेत स्पेसएक्स ही कंपनी कार्यरत असून ती २०२४ पर्यंत मंगळावर लोकांना घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. ब्ल्यू ओरिजिन नावाची कंपनीही कार्यरत आहे. या कंपनीने बीई-४ रॉकेटचे इंजिन तयार केले आहे. अमेरिकेतील तिसरी प्रसिद्ध कंपनी आहे ती म्हणजे व्हर्जिन गॅलॅक्टीक. या कंपनीने स्पेसशिप टू यशस्वीपणे चालवले आहे. एकूणच या अमेरिकेतील आघाडीच्या खाजगी कंपन्या आहेत ज्या नासाच्या सलग्न काम करताना दिसतात.