१५ दिवसांसाठी होऊ शकते संपूर्ण बाजारपेठ बंद !

26 Jun 2020 12:43:33

- होम डिलिव्हरी देण्यास मुभा; महापालिका आयुक्तांचे संकेत
- सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी घेतली आयुक्तांची भेट; तासभर केली चर्चा

पनवेल: संपूर्ण महापालिका परिक्षेत्रातील बाजारपेठ, अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह पूर्णतः व्यवहार पंधरा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे संकेत महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी होम डिलिव्हरीचा पर्याय खुला ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
 
Kantilal_1  H x
 
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आज, गुरुवारी (ता. २५) दुपारी देशमुख यांची त्यांच्या दालनात भेट घेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सविस्तरपणे चर्चा केली. त्यावेळी उपायुक्त संजय शिंदे उपस्थित होते. कोरोना रुग्ण आता दररोज शंभरीने वाढत असताना प्रशासनाने उपाययोजना करताना विशेष अधिकार वापरून कडक लॉकडाऊन करावे, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर कडू यांनी ठेवला असता, पुढच्या 15 दिवसांकरिता पूर्ण लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला आजच पाठविला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय लवकरच पोलिस अधिकारी, इतर प्रशासनाला सोबत घेऊन याबाबत ठोस निर्णय घेण्याचेही त्यांनी कडू यांना आश्वासन दिले.
 
डॉक्टर आणि खाटा वाढविताना महापालिका क्षेत्रातील सामाजिक, राजकीय पक्षांसह खासगी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका ताब्यात घ्याव्यात. रुग्णांना घेवून जाण्याची सोय महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात नाही. शिवाय राज्य शासनाच्या वतीने रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दिले असल्याची माहिती कडू यांनी देवून रुग्णवाहिका ताब्यात घेण्यास सुचविले. त्यावरही आयुक्त देशमुख यांनी सकारात्मकता दाखवली.
 
वाढत्या कोरोना रुग्णांच्या मानाने डॉक्टर महापालिकेकडे नाहीत. ती अडचण आहे. रुग्ण वाढतात पण डॉक्टर नसल्याने इंडिया बुल्समध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचे कडू यांनी देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यावर पर्याय देताना, नव्याने भर्ती करून घेणे, खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना सक्तीने ड्युटी देणे आणि जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य खात्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर ताब्यात घेण्याची निर्णय प्रक्रिया राबविवी, अशा सुचनाही केल्या. आयुक्त देशमुखांनी सुचनांचा गांभीर्याने विचार करणार असल्याचे सांगितले.
 
तसेच नागरिक निष्काळजीपणा करत घराबाहेर पडत असल्याने कोरोना वाढत असल्याची खंत व्यक्त केली. नागरिकांनी दक्षता घेतल्यास कोरोना आटोक्यात येऊ शकतो. शासनस्तरावर जितक्या उपाय योजना करणे शक्य आहे, ते केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी बैठकीतून दिली. डॉक्टर, रुग्णांच्या जेवणाच्या मुद्द्यावर बोलताना उपायुक्त संजय शिंदे म्हणाले की, ठेकेदार बदलला आहे आणि सकस, पोषक आहार सुरू केला आहे. यापुढे कोणतीही कसूर ठेकेदार करणार नाही याकडेही लक्ष देवू असे ते म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0