पालकमंत्री सुभाष देसाई थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

25 Jun 2020 22:23:21

- शेतकऱ्यांशी साधला मनमोकळा संवाद
- विविध योजनांच्या कामांचीही केली पाहणी
- बांधावर खते, बियाणे पुरवठा मोहिमेस दाखवली हिरवी झेंडी

औरंगाबाद : जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव, महालगाव आणि गंगापूर तालुक्यातील वाहेगाव या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा), एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ आदी योजनेतील कामांची प्रत्यक्ष पाहणी, थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. तसेच शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
 
Subhash-Desai_1 &nbs
 
सुरुवातीला वैजापूर तालुक्यातील हनुमंत गाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीत असलेल्या शेती शाळेला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन प्रात्यक्षिकाची पाहणी केली. त्यानंतर वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे संपत शेळके यांच्या शेतातील शेततळ्याची पाहणी केली. बांधावर खते, बियाणे पुरवठा या मोहिमेतंर्गत येथील शेतकरी गटांनी खरेदी केलेल्या खताच्या गाडीस पालकमंत्री देसाई यांनी हिरवी झेंडी दाखवली.
 
गंगापूर तालुक्याच्या वाहेगावातील संपत मनाळ यांच्या शेतातील पिकांची पाहणीही देसाई यांनी करून येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच वाहेगाव येथील मच्छिंद्र मणाळ यांच्या कांदा चाळीला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी देसाई यांच्याहस्ते वृक्षारोपन करण्यात आले. या भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी लाभ घेतलेल्या विविध योजनांची माहिती पालकमंत्री देसाई यांना जिल्हाधिकारी चौधरी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी डॉ.मोटे यांनी सविस्तरपणे दिली.
 
पाहणी दरम्यान त्यांच्यासमवेत आमदार रमेश बोरणारे, आरोग्य सभापती अविनाश गलांडे पाटील, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गांजेवर, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उप विभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख आदींसह महसूल, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0