अमित ठाकरेंची मागणी अजित पवारांकडून मान्य

जनदूत टिम    24-Jun-2020
Total Views |
मुंबई : ‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करु, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना दिलं आहे. अमित ठाकरे यांनी आज (२३ जून) मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकरदेखील होते.
 
Amit-Thackeray-Ajit-Pawar
 
अमित ठाकरे, बाळा नांदगावकर आणि अजित पवार यांच्यात आज बैठक झाली. या बैठकीत ‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनाबाबत चर्चा झाली. यावेळी अजित पवार यांनी अमित ठाकरेंची मागणी मान्य केली. त्यांनी अमित ठाकरे यांना ‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात दोन हजारांनी वाढ करु, असं आश्वासन दिलं. याशिवाय याबाबत लवकरच घोषणा करु, असंदेखील अजित पवार यांनी सांगितलं.
 
केंद्राकडून ‘आशा’ स्वयंसेविका यांना सध्या दोन हजार रुपयांचे मानधन मिळत आहे. राज्याकडून त्यांना दोन हजार रुपये मिळाल्यास त्यांचे एकूण मानधन चार हजार होईल. काही दिवसांपूर्वी काही ‘आशा’ स्वयंसेविकांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली होती. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त दोन हजार रुपये मानधन मिळत असल्याची तक्रार त्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे केली होती. याशिवाय त्यांनी सरकारकडून मानधन वाढवून मिळावं यासाठी अमित ठाकरे यांची मदत मागितली.
 
अमित ठाकरे यांनी तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबत पत्र लिहित ‘आशा’ स्वयंसेविकांचं मानधन वाढवून देण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीदेखील भेट घेतली.
“आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकट काळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून द्यावा”, असं अमित ठाकरे अजित पवार आणि राजेश टोपे यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले होते.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी अमित ठाकरे यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अमित ठाकरे यांनी मांडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या बारा तासात आपला शब्द पाळत त्यांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली होती.